बीड: वंजारी समाजाला दोन टक्क्यांऐवजी वाढीव दहा टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज बीडमध्ये वंजारी समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात महिला, पुरुष, विद्यार्थी, तसंच व्यावसायिक शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, ग्रामीण भागातील ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
'आरक्षण देता की, खुर्च्या सोडता, एकच मिशन, वंजारी आरक्षण' अशा अनेक घोषणांचे फलक वापरुन पहिल्यांदाच वंजारी समाज मोठ्या प्रमाणात बीडमध्ये रस्त्यावर उतरताना पाहायला मिळाला. राज्यातील वंजारी समाजाला दोन टक्के आरक्षण असून वाढत्या लोकसंख्येमुळे आता या आरक्षणात वाढ करुन ते 10 टक्के करावं ही या मोर्चेकऱ्यांची मागणी होती.
आज बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
वंजारी समाजाची राज्यात 95 लाखांवर लोकसंख्या असल्याची नोंद आहे. सरकारने जनगणना करुन वंजारी समाजाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वाढीव आरक्षण द्यावे, अशी समाजबांधवांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. याच मागणीसाठी आज पुन्हा वंजारी समाज रस्त्यावर आला.
विशेष म्हणजे हा मोर्चा समाजाच्या हिताचा असून कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही अथवा कोणाच्याही विरोधात नाही असं यापूर्वीच वंजारी आरक्षण मागणी कृती समितीने जाहीर केलं होतं. राज्यात यापूर्वी मराठा समाज, त्यानंतर धनगर आणि ओबीसी समाजाचे सुद्धा मोठे मोर्चे निघाले, त्याच प्रकारे वंजारी समाजाचादेखील हा मोर्चा निघाला.
मोर्च्याचे नेतृत्व ही लहान मुलींनी केलं आणि मोर्च्यामध्ये सहभागी झालेल्या तरुणांच्या डोक्यावर आरक्षण मागणीसाठीच्या पांढऱ्या टोप्या आणि भगवे झेंडे हातात घेतले. वंजारी समाजाला वाढीव आरक्षण द्या अशा आशयाचे फलक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये पाहायला मिळाले.
वाढीव आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये वंजारी समाजाचा विराट मोर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Aug 2019 09:13 PM (IST)
'आरक्षण देता की, खुर्च्या सोडता, एकच मिशन, वंजारी आरक्षण' अशा अनेक घोषणांचे फलक वापरुन पहिल्यांदाच वंजारी समाज मोठ्या प्रमाणात बीडमध्ये रस्त्यावर उतरताना पाहायला मिळाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -