Nashik To Pandharpur : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकऱ्यांना पंढरपूर (Pandharpur) येथे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागानेही (Nashik) नियोजन केले आहे. नाशिक विभागातून 25 जून ते चार जुलै या कालावधीत पंढरपूर साठी जवळपास 290 जादा बस सेवा सोडण्यात येणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसची सुविधा उपलब्ध करून दिली असून, या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.



हरिनामाचा गजर करत अवघा महाराष्ट्र भक्तिमय झाला असून आषाढी एकादशीसाठी वारकरी पंढरपूरला रवाना झाले आहेत तर अनेक नागरिकांना आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरला जाण्याची इच्छा असते. त्यामुळे राज्यभरातून एसटी महामंडळाच्या वतीने बसेसची सुविधा करण्यात येत आहे. येत्या 29 जून रोजी आषाढी एकादशी असून तीन जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. या काळात पंढरपूरकडे असणारी यात्रेकरुंची गर्दी लक्षात घेता नाशिक विभागाच्या (Nashik ST) वतीने ज्यादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक एक आणि दोन आगार महामार्ग बस स्थानक मालेगावातील नवीन बस स्थानक, सटाणा, नामपुर, देवळा, तहाराबाद, मनमाड, चांदवड, सिन्नर, वावी, लासलगाव, विंचूर, निफाड, चांदोरी, नांदगाव, इगतपुरी, घोटी, येवला, कळवण, वणी, पिंपळगाव बसवंत, ओझर येथून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. 


पंढरपूरसाठी (Pandharpur) नाशिक आगारातून सोडण्यात येणाऱ्या नियमित बसना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळेच जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांकडून सुरक्षित प्रवास म्हणून नेहमीच एसटीला प्राधान्य दिले जाते. आषाढी एकादशी निमित्ताने शहर आणि ग्रामीण भागातील भाविकांना पंढरपूर येथे जाण्यासाठी 21 जूनपासून जादा बस सेवा सुरू करण्यात आले आहेत. या बससेवेला राज्य परिवहन महामंडळाच्या महिला सन्मान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 50 टक्के सवलतीचा तसेच 65 ते 75 वर्षाच्या जेष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलतीचा व अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमार्फत मोफत प्रवास सुविधेचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. पंढरपूरच्या आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते त्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे


महिलांना 50 टक्के सवलत लागू 


भाविकांचे दर्शन सुखकर व्हावे यासाठी मनमाड आगारातर्फे विशेष नियोजन करण्यात आले आहे. ज्या गावातून थेट पंढरपूरसाठी 40 किंवा अधिक प्रवासी असतील. त्यांच्यासाठी थेट गावातून बस उपलब्ध करून देण्यात येत आहे. महामंडळाच्या मनमाड आगाराकडून मनमाड पंढरपूर ही विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मनमाड येथून सकाळी साडेसात आणि दुपारी साडेतीन वाजता ही बस सुटणार आहे. दरम्यान 25 जूनला एक, 26 तारखेला चार, 27 जूनला दोन, 28 तारखेला सहा, 29 जूनला पाच, 30 जूनला आणि एक जुलैला प्रत्येकी एक तर दोन जुलै रोजी एक बस असे पंढरपूर बससेवेचे नियोजन मनमाड आगारातून करण्यात आले आहे. 



थेट गावातून करता येणार प्रवास


एखाद्या गावातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ पंढरपूरला जाऊ इच्छित असतील, तर त्यांच्या गावातूनच थेट बस उपलब्ध करून देण्याची तयारी महामंडळाने दर्शविली आहे. प्रवाशांची संख्या पुरेशी असेल, तर थेट पंढरपूरपर्यंतचा व तेथून पुन्हा गावापर्यंतचा प्रवास त्यांना करता येणार आहे. थेट गावांमधून बसच्या बुकिंगलादेखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 27 जून रोजी सर्वाधिक 110 बस पंढरपूरला पाठविण्यात येणार आहेत. परंतु, पंढरपूर मार्गावर जादा बसची व्यवस्था करण्यात आली असली, तरी अन्य मार्गांवर प्रवाशांची बसअभावी गैरसोय होणार नाही, याची देखील काळजी घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.