Nagpur News : घरसमोर मॅक्सी वाहन ठेवण्याच्या कारणाहून दोन गटात झालेल्या वादातून झालेल्या हाणामारीत अठरा वर्षीय युवकाचा खून झाला. याप्रकरणी तिघे जखमी असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात (GMC) उपचार सुरू आहेत. ही घटना यशोधरानगरात गुरुवारी (19 जानेवारी) रात्री उशिरा सुमारास घडली.


योगेश धामने (वय 18 रा. इंदिरा गांधीनगर) असे मृत युवकाचे नाव असून तो पेंटिंगचे काम करतो. रामभाऊ शाहू (रा. विनोबा भावेनगर) असे जखमीचे नाव आहे. मोनू बन्सीलाल रायतदार (वय 22), सुदामा बन्सीलाल रायतदार वय (वय 24) आणि नंदलाल रायतदार (सर्व रा. विनोबा भावेनगर) अशी आरोपींची नावे आहेत. 


पोलिसांनी (Nagpur Police) दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रामभाऊ शाहू आणि योगेश धामने यांचा मोनू रायतदार, सुदामा आणि त्यांचा काका नंदनलाल रायतदार यांच्यात वाद झाला होता. झालेल्या भांडणात त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. दरम्यान गुरुवारी रात्री जेवण झाल्यावर योगेश रामभाऊ शाहू यांच्या घरी आला. ते दोघेही बाहेर उभे असताना, मोनू आणि योगेशमध्ये पुन्हा वाद झाला. त्यातून रामभाऊ यांनी मोनूला मारहाण सुरु केली. त्यामुळे घरातून नंदलाल आणि सुदामा आल्याने त्यांनी चाकू, दंडा आणि लोखंडी रॉडने योगेशला मागण्यास सुरुवात केली.


जखमींवर उपचार सुरु


यात योगेशचा जागीच मृत्यू झाला. रामभाऊ शाहू आणि मोनू गंभीर जखमी झाल्याने त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. विशेष म्हणजे रामभाऊ शाहू याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला.


पार्किंगवरुन वादाच्या घटनांमध्ये वाढ


एकीकडे शहरात वाहनांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे वाहनाच्या पार्किंगसाठी जागा सापडत नाही. त्यामुळे नागरिक जागा मिळेल तिथे वाहन पार्क करत असतात. त्यामुळे अनेकवेळा पार्किंगच्या प्रश्नावरुन वाद होत असतात. कधी कधी हा शाब्दिक वाद हाणमारीपर्यंतही पोहोचतो. तर अनेकवेळा या वादामुळे हत्या सारखे गुन्हेही घडतात.


पुण्यात झाली होती इंजिनीअरची हत्या


पुण्यात काही महिन्यांपूर्वी कार पार्किंगच्या वादातून एका सॉफ्टवेअर इंजिनीअरची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत सॉफ्टवेअर इंजिनीअरचं नाव नेवल बत्तीवाला असं होतं. नेवलच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, नेवलच्या बाजूला राहणाऱ्या टूरिस्ट कंपनीच्या ड्रायव्हर्ससोबत गेल्या अनेक दिवसांपासून पार्किगवरुन वाद सुरु होता.


ही बातमी देखील वाचा...


नागपुरात दुचाकीसह 20 फूट खड्ड्यात पडल्याने निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू; मोबाईल लोकेशनच्या मदतीने सापडला मृतदेह