सोलापूर : आर्ची आलीय असं म्हटलं तरी महाराष्ट्रातली तरुणाई आजकाल पागल होते. आर्ची अर्थात रिंकू राजगुरुची एक झलक पाहण्यासाठी पोरं सहज 100-200 किलोमीटरचं अंतर कापून येतात. त्यामुळेच आर्चीचा तिच्या शाळेतला पहिला दिवस कसा आहे, हे पाहण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट अकलूजला पोहोचली.


 

 

घंटा वाजली, एका लाईनमध्ये जिजामाता कन्या विद्यालयातल्या मुली प्रार्थनेसाठी तयार झाल्या. कॅमेरा आर्चीला शोधतच होता. पण ती काही दिसली नाही. कारण शाळेत गर्दीच तेवढी. प्रार्थना संपली आणि शाळेच्या बाईंनी मुलींचं अभिनंदन केलं आणि शाळेच्या कामगिरीची माहिती पुरवली.

 

 

मग मुलींनी आपआपला वर्ग गाठला. दहावी 'ब' ची पाटी दिसली. आम्ही रिंकूला शोधू लागलो. पण रिंकू काही दिसली नाही. अर्थात बाई इंग्रजी शिकवत होत्या, त्यामुळे 'मराठीत सांगितलेलं कळत नाय, इंग्लिशमध्ये सांगू?', हा आर्चीचा डायलॉग आठवलाच.

 

 

'सैराट'मध्ये आर्ची अॅव्हरेज स्टुडंट असली तरी रिंकू प्रत्यक्षात हुशार आहे. त्यामुळे तिची शाळा बुडल्याचा, अभ्यास बुडल्याचा फारसा परिणाम होणार नाही, असं शिक्षकांचं मत आहे.

 

 

आता आर्ची शाळेत दिसली नाही, म्हणून थेट अकलूजच्या शिक्षक कॉलनीतील तिचं घर गाठलं. मात्र तिथेही चाहते होतेच. लांबलांबहून आर्चीला बघायला येतात. घरासमोर येऊन फोटो काढतात, तेवढ्यावरच खूश होतात.

 

 

29 एप्रिलला 'सैराट' रिलीज झाला. सिनेमाने 'सैराट' कामगिरीही केली. आर्ची म्हणजे रिंकू रातोरात स्टार झाली. काही दिवसांपर्यंत अकलुजच्या कन्या प्रशालेत सायकलवर येणारी रिंकू चाहत्यांच्या ससेमिऱ्यामुळे आज शाळा सुरु होऊनही शाळेत येऊ शकली नाही. सिक्युरिटीशिवाय फिरणं अशक्य झालं. मात्र या धबडग्यात तिची शाळा, मित्र-मैत्रिणी, अभ्यास हरवून गेला आहे.

 

 

रिंकूने 'सैराट'मधल्या आर्चीला स्पर्श केला आणि भूमिकेचं सोनं झालं. आता तिच्यासाठी दहावीचा टर्निंग पॉईंट आहे. तिथंही तिला सैराट यश मिळो. फक्त चाहत्यांनी जरा धीरानं घ्यावं. नाहीतर पुन्हा आर्ची तोच डायलॉग ऐकवायची... मराठीत सांगितलेलं कळत नाही का इंग्रजीत सांगू?