वर्धा : कोरोना काळात महत्वाचं ठरलेल्या रेमडेसिवीरचं उत्पादन वर्ध्यात सुरु झालं आहे. आता वर्ध्यात रेमडेसिवीरनंतर अम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन बनवण्याची देखील मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने अम्फोटेरिसिन बी उत्पादनास परवानगी मिळाली असल्याचे जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी ही माहिती दिली आहे. येत्या 15 दिवसात या इंजेक्शन बनवण्याची प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन ब्लॅक फंगसवर उपयोगी आहे. लवकरच उत्पादनाला सुरुवात होणार असून केवळ 1200 ते 1400 रुपयात हे इंजेक्शन उपलब्ध होणार आहे, असं डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी या इंजेक्शनचे उत्पादन करण्यास परवानगी मिळाली. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने अम्फोटेरिसिन बी औषधाची निर्मिती येथे होणार आहे. दररोज 20 हजार इंजेक्शन येथे तयार होणार असल्याची माहिती डॉक्टर क्षीरसागर यांनी दिली आहे.
कोविड काळात म्युकर मायकोसिस ब्लॅक फंगस या आजाराचेही रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या जीवघेण्या आजारावर प्रभावी म्हणून अम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनचा वापर केला जातो. 7 हजार रुपये किंमत असलेलं हे इंजेक्शन काळाबाजार करुन महागड्या दराने विकले जात असल्याचे बोलले जाते. एका रुग्णाला गरज लागणाऱ्या इंजेक्शनची संख्या 30 ते 50 च्या जवळपास आहे. इंजेक्शनची गरज बघता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जेनेटिक लाईफ सायन्सेसने हे एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन बनविण्यासाठी पाऊल उचलले. यामुळे वैद्यकीय क्षेत्रासोबतच नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.
गडकरी यांच्या प्रयत्नातून मिळाली परवानगी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी जेनेटिक लाईफ सायन्सेसला रेमडेसिवीरचं उत्पादन सुरु करण्यास परवानगी मिळाली. रेमडेसिवीरची पहिली खेप स्टॉकिस्टला वितरित करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या प्रयत्नातून म्युकर मायकोसिसवरील एम्फोटेरिसीन बी इंजेक्शनचं उत्पादन वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेसमध्ये होणार आहे.
दररोज 20 हजार इंजेक्शन तयार होणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने अम्फोटेरिसिन बी इंजेक्शन निर्मितीसाठी परवानगी मिळाली आहे. येत्या 15 दिवसात या इंजेक्शन बनवण्याची प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. ब्लॅक फंगस इन्फेक्शनवर याचा वापर होतो. केवळ 1200 ते 1400 रुपयात हे इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. दररोज 20 हजार इंजेक्शन येथे तयार होणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक डॉक्टर महेंद्र क्षीरसागर यांनी दिली.