जळगाव: 'एकनाथ खडसेंनी माझ्यावरही कितीही अब्रुनुकसानीचे दावे केले, तरी त्यांना कोर्टात भ्रष्ट असल्याचं सिद्ध करेन', असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

 

खडसेंची आणखी 23 प्रकरणं आपल्याकडे आली असून त्या प्रकरणातील माहिती आणि कागदपत्रे मिळविण्याचा प्रयत्न सुरु असून ही सर्व कागदपत्र कोर्टात सादर करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्या काल जळगावात बोलत होत्या.

 

नुकतीच पुण्याच्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी खडसेंना क्लीन चिट दिली आहे. मुख्यमंत्री हे संपूर्ण राज्याचे असतात एका पक्षाचे नसतात. यामुळे मुख्यमंत्र्यांनी समतोल भूमिका घ्यायला हवी होती. मात्र, ती त्यांनी न घेतल्यानं आता त्यांच्या कोणत्याही चौकशीवर आपला विश्वास राहिला नसल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. खडसेंविरोधात आता एकत्रितरित्या हायकोर्टात जाणार असून एसआयटी मार्फत चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.