मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) या त्यांच्या कुटुंबाबरोबर परदेशात काही दिवसांपूर्वी फिरायला गेल्या होत्या. त्यांच्या या परदेशवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील (NCP Ajit Pawar Group) पदाधिकारी सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी जोरदार टीका केली होती. सुरज चव्हाण यांनी दमानिया यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली होती. अंजली दमानिया यांनी भारतात परतल्यानंतर मी काहींना धडा शिकवणार, असा इशाराच दिला होता. यानंतर सुरज चव्हाण यांनी रिचार्जवाल्या ताईच्या कारनाम्याचे पुस्तक बनेल, एक एक अध्याय महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार, असे म्हणत पुन्हा एकदा अंजली दमानिया यांना डिवचले होते. आता अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि सुरज चव्हाण यांना थेट मानहानीची नोटीस (Defamation Notice) बजावली आहे. 

आता शेवटपर्यंत कायदेशीर कारवाई करणार

अंजली दमानिया यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाला व त्यांच्या अधिकृत प्रवक्ते सुरज चव्हाण यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. त्यांनी जे वाट्टेल ते वक्तव्य केलं ‘सुपारीबाज बाई’, ‘रिचार्जवर चालणारी बाई’, कोणी अग्रवाल वकिलांकडून पैसे घेतले, त्यांच्या मुलांचा, नवऱ्याचा सगळा डिटेल्स देणार, त्या ब्लॅकमेलर आहेत का? असे विचारल्यावर, ‘100 टक्के’, हे जे जे अतिशय गंभीर, बेछूट, गलिच्छ आणि खालच्या दर्ज्याचे आरोप एका सुसंस्कृत, सिध्दांतवादी व्यक्तीबद्दल केलेत याची अद्दल तुम्हाला भोगावी लागेल. मी आता शेवटपर्यंत कायदेशीर कारवाई करणार आहे, असा इशाराच त्यांनी दिला आहे. 

 

नेमकं प्रकरण काय? 

अंजली दमानिया या त्यांच्या कुटुंबाबरोबर परदेशात फिरायला गेल्या होत्या. त्यांच्या या परदेशवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील पदाधिकारी सुरज चव्हाण यांनी टीका केली होती. कष्टाच्या पैशांनी कुठे फिरलात ते सांगा, म्हणत त्यांनी दमानिया यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली होती. यानंतर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत सुरज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. सुरज चव्हाण ताळतंत्र नसलेला माणूस आहे. मी या लोकांना आता सरळ करणार आहे. यांनाच नाही तर, यांच्या मालकांनाही सरळ करणार आहे. तुम्ही राजकारणात येऊन निवडणूक लढण्याच्या आधीच तुमचं राजकारण संपवणार आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले होते. यानंतर सुरज चव्हाण यांनी काहीही न करता सामाजिक कार्यकर्ता असलं की 65 देश फिरता येऊ शकतात. रिचार्जवाल्या ताईच्या कारनाम्याचे पुस्तक बनेल, एक एक अध्याय महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार, असे प्रत्युत्तर दिले होते. आता अंजली दमानिया यांनी थेट मानहानीची नोटीसच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि सुरज चव्हाण यांना बजावली आहे. यामुळे अंजली दमानिया आणि सुरज चव्हाण यांच्यात चांगलीच जुमल्याचे चित्र आहे. 

आणखी वाचा 

Harshvardhan Patil: काल तुतारी हाती घेण्याची चर्चा, आज हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांची भेट, पुण्यात राजकीय घडामोडींना वेग