मुंबई : माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दापोलीमधील वादग्रस्त साई रिसार्ट जमीनदोस्त होणार आहे. या रिसार्टसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटीची बैठक झाली आहे. रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली आहे. तर या रिसार्टप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya)  शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर आरोप केले होते.


केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होणार आहे. सी कोच आणि साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात आराखडा तयार  करण्यात आला आहे. रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र शासनाने घालून दिलेल्या विहित नियमानुसार कारवाई होणार असल्याची माहिती  डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली आहे


सोमय्यांचे आरोप काय?


अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकादयेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. 12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले होते. साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90  दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे. 


अनिल परब यांची ईडी चौकशी


शिवसेना नेते अनिल परब यांची दापोली रिसॉर्ट प्रकरणी याआधी ईडीने चौकशी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री असताना अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी आणि खासगी निवासस्थानी ईडीकडून मे महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर अनिल परब यांची तीनदा ईडी चौकशी करण्यात आली होती. साई रिसॉर्ट आपले नसल्याचा दावा परब यांनी याआधीच केला आहे.