मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab)  यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांनी प्रतिज्ञापत्रासह त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हँडलवर, किमान दोन प्रमुख इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेच्या वृत्तपत्रांमध्ये जाहीररित्या बिनशर्त माफी मागावी अशी मागणी परब यांनी याचिकेतून केली आहे. तसेच भविष्यात आपल्याविरोधात सोमय्यांना कोणतेही बदमानीकारक व्यक्तव्य करण्यापासून मनाई करण्याचे आदेशही देण्याची मागणी अनिल परबांनी या याचिकेतून केली आहे. 


'त्या' घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करा !! शेलारांची मागणी


किरीट सोमय्या यांनी मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांच्या घोटाळ्यांबाबत पत्रकार परिषदा घेऊन आरोप करण्याची मालिका सुरु केली आहे. सोमय्यांनी अनिल परब यांनाही सातत्याने लक्ष्य करून अनिल देशमुख प्रकरणात परब यांचाही सहभाग असल्याचा आरोप करत केला होता. याशिवाय परब यांचे दापोलीतील हॉटेल तसेच परिवहन विभागातील बदल्यांच्या प्रकरणावरूनही सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळेच परब यांनी सोमय्या यांना 14 सप्टेंबर रोजी नोटीस पाठवली होती. 72 तासांच्या आत सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डिलीट करण्याचा तसेच बिनशर्त माफी मागण्याचा इशाराही या नोटीसीतून देण्यात आला होता. मात्र, सोमय्या यांनी माफी न मागितल्यामुळे मंगळवारी परब यांच्यावतीने अॅड. सुषमा सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे.


आपल्यावर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील बांधकामांसंदर्भात बदनामीकारक आणि अर्थहीन आरोप सोमय्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. मात्र, त्या बांधकामांशी आपला कोणताही संबंध नाही. तसेच या कथित घोटाळ्यासंदर्भात आपल्याला संबंधित प्राधिकरणाकडून नोटीसही बजावण्यात आलेली नाही. सोमय्या यांनी केवळ या बदनामीवर न थांबता आपल्यावर खंडणी वसूलीचेही आरोप केले आणि अटक करण्याची मागणीही केली. त्याविरोधातच आपण हा अब्रुनुकसानीचा दावा केल्याचे परब यांनी याचिकेत म्हटलेलं आहे.