मुंबई : महाराष्ट्र राज्याचे परिवाहन मंत्री अनिल परब आज ईडी कार्यालयात हजर झाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख विरुद्ध दाखल गुन्हाच्या तपासामध्ये अनिल परब यांचे नाव आलं आणि आता याच प्रकरणी अनिल परब यांची चौकशी केली जात आहे. 


अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांसमोर हा विश्वास दाखवत आज सकाळी 11.04 मिनिटांनी ईडी कार्यालयात प्रवेश केला. अनिल परब यांना ईडी ने या आधी 31 ॲागस्टला चौकशीसाठी बोलवलं होतं पण दुसऱ्या कामात व्यस्त असल्याचं सांगत अनिल परब गेले नाही. आज मात्र अनिल परब ईडी चौकशीला सामोरे जात आहेत. अनिल परब यांना कोणत्या प्रकरणात चौकशीसाठी बोलवलं जात आहे याची कल्पना नाही मात्र ईडी सूत्रांनी एबीपी माझाला माहिती दिली की अनिल देशमुख प्रकरणामध्ये अनिल परब यांच्या बद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे ही चौकशी केली जात आहे.


 



ईडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे याने ईडीला जबाब दिला की मुंबई पोलिस दलात डीसीपी बदल्यांमध्ये 40 कोटी रुपये घेण्यात आले. ज्या पैकी 20 कोटी अनिल देशमुख तर 20 कोटी रुपये आरटिओ अधिकारी बजरंग खरमाटेच्या माध्यमातून अनिल परबला दिले गोल्याची माहिती वाझेने दिली. इतकच नाही तर बीएमसी कंत्राटदारांकडून वसुली करणं आणि एसबीयूटीच्या एका प्रकल्पात 50 कोटी रुपये घेण्याचं काम अनिल परब यांनी त्याला दिले असा आरोप सचिन वाझेने ईडी समोर केला आहे. यामुळेच ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी बोलवलं आहे. 


याशिवाय ईडीकडे एका माजी आरटीओ अधिकाऱ्याने परिवाहन खात्यामध्ये बदल्यांसाठी कोट्यावदीची रक्कम घेतली गेली अशी तक्रार केली. या तक्रारीमध्ये आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांनी बदल्यांसाठी पैसे घेतले आणि  पैसे अनिल परब यांच्यापर्यंत पोहचले असा आरोप आहे. त्यामुळे ईडी या तक्रारी वर कथित आरटीओ स्कॅम बद्दल ही चौकशी करत आहे. 


 या प्रकरणामध्ये ईडी ने बजरंग खरमाटे यांची सात तास चौकशी झाली तर त्यांच्या घरी वर कार्यालयात छापेमारी ही केली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईच्या माध्यमातून अनिल परब यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न ईडी करत असल्याचा ही सांगितलं जात आहे.


पण अनिल परब यांचा आत्मविश्वास पण बरचं काही सांगतं. एकीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पाच समन्सनंतर ही ईडी समोर हजर होत नाहीत. ईडी त्यांच्या विरुद्ध लुकआऊट नोटीस काढते तर दुसऱ्या बाजूला अनिल परब हे दुसऱ्या समन्सला ईडी समोर हजर झाले. आपण कोणता ही गैरव्यवहार केला नाही तर आपण चौकशीला का घाबरायचं असं म्हणत अनिल परब यांनी जनतेसमोर स्वःताला क्लिन चीट दिली. तर आरोप करणारा व्यक्त हा स्वःता एक आरोपी असल्याने त्याच्या बोलण्याला कोणते ही महत्व नाही, असे देखील अनिल परब म्हणाले. 


तर राजकीय वर्तुळात  या कारवाईच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर दबावतंत्र आणण्यासाठी केलं जात असल्याची ही चर्चा आहे. तर या चौकशी नंतर अनिल परब यांच्या राजकीय भवितव्यावर विरोधकांकडून प्रश्न विचारलं जात तर विरोधक येणाऱ्या काळात अनिल परब, भावना गवळी, आनंदराव अडसूळ नंतर शिवसेनेचे आणखी काही मोठी नाव केंद्रीय एजन्सीच्या रडारवर येतील असं सूचक इशाराही देत आहेत.