अमरावती परमबीर सिंहांनी (Parambir Singh)  केलेल्या आरोपांना सलील देशमुखांनी आरोपांनीच उत्तर दिलंय. परमबीर सिंह यांचा मुलगा रोहन परमबीर सिंह बऱ्याच बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुखांनी (Saleel Deshmukh)  केलाय .चुकीच्या लोकांसोबत त्याचं उठणं बसणं होतं असंही सलील देशमुखांनी म्हटलंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज एकाही आरोपावर उत्तर न देता मौन बाळगलं. तर सलिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांचे सगळे आरोप फेटाळून लावत त्यांच्यावरच अँटिलिया स्फोटक प्रकरणात आरोप केले.


परमबीर सिंह खोटारडे आहेत, ते दिशाभूल करतायत, समित कदमांची नार्को टेस्ट करा, तसंच परमबीर सिंहांनी अँटिलिया केसमध्ये काय झालं ते सांगावं,  अशी मागणी  सलील देशमुख यांनी  केली आहे.  परमबीर सिंह जर इतके प्रमाणिक आहेत तर त्यांनी त्याच वेळी राजीनामा देऊन या सर्व गोष्टी समोर आणायला हव्या होत्या.  अटक होण्याच्या भीतीने त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील भारतीय जनता पक्षापुढे शरणागती पत्करली. सुरुवात ही समित कदमपासून झाली आहे.  समीत कदम हा कुणाचा माणूस होता हे आपल्याला विसरता कामा नये.  समित कदमचा गॉड फादर कोण आहे हे पण आपल्या सर्वांना माहिती आहे. परमबीर सिंह कोर्टापुढे काहीच बोलले नाही. चांदीवाल आयोगापुढे देखील काहीच बोलला नाही. हे सगळं करून परमबीर सिंहला जर वाटत असेल की, तो एनआयएच्या अटकेपासून वाचेल तर तो वाचणार नाही, अस सलील देशमुख म्हणाले.  


सलील देशमुखांचे परमबीर सिंहांच्या मुलावर गंभीर आरोप


परमबीर सिंह यांचा मुलगा रोहन परमबीर सिंह बऱ्याच बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप सलील देशमुखांनी केलाय. चुकीच्या लोकांसोबत त्याचं उठणं बसणं होतं असंही सलील देशमुखांनी म्हटलंय. रोहन बऱ्याच ठिकाणी जाऊन खंडणी वसूल करायचा. चुकीच्या लोकांसोबत त्याचे उठणे बसणे होते. रोहनच्या बंगळूरु येथे झालेल्या विवाह सोहळ्यात कोण कोण उपस्थित होतं याच्या व्हिडिओ क्लिप्स देखील येत्या काही दिवसात समोर येतील, असे सलील देशमुख म्हणाले.  


 परमबीर सिंह खोटारडे, सलील देशमुखांनी आरोप फेटाळले


सलील देशमुख ललित हॉटेलमध्ये बसून डील करायचे असा आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलाय.मात्र हे आरोप सलील देशमुखांनी फेटाळले आहेत.  परमबीर सिंह खोटारडे असून ते दिशाभूल करत असल्याचं सलील देशमुखांनी म्हटलंय. तर परमबीर सिंहांनी अँटिलिया केसमध्ये काय  झालं ते सांगावं असंही देशमुख म्हणाले.  ज्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारने त्यांची बदली केली त्यानंतर त्यांनी आरोप केले. परमबीर सिह यांना अँटीलिया प्रकरणात अटक करणार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना बाजूला करण्यात आले, असे सलील देशुमख म्हणाले.


आमची पुढची भूमिका आपल्याला लवकरच कळेल : सलील देशमुख


ईडी तुमची सीबीआय तुमची, तुम्ही इतक्या धाडी मारल्या, माझ्या सहा वर्षांच्या मुलीची देखील चौकशी केली.. कुठे गेले शंभर कोटी आम्हाला दाखवा.... अशा पद्धतीचे आरोप करून मूळ मुद्द्याला बगल देण्याचे काम या ठिकाणी होत आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आमची पुढची भूमिका आपल्याला कळेलच, असे सलील देशमुख म्हणाले. 


Video : परमबीर सिंह अँटिलिया केसचा मास्टरमाईंड : सलील देशमुख



हे ही वाचा :


'गुन्हे दाखल करणारे सूत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्यामागे पवार, ठाकरे', परमबीर सिंहांचा गौप्यस्फोट