मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधीत भ्रष्टाचार प्रकरणाचा गोपनीय अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयच्या एका उपनिरिक्षकाला काल अटक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याला लाच म्हणून एक लाख रुपयांचा आयफोन-12 देण्यात आला असल्याचे आता समोर आले आहे. याप्रकरणी सीबीआय अधिकारी अभिषेक तिवारीला अटक करण्यात आली असुन, अनिल देशमुख देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून सुरु असलेल्या तपासाचा अहवालाचा गैरवापर केल्याच्या प्रकरणात आरोप करण्यात आला आहे. 


 अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही अटक करण्यात आली आहे. अभिषेक तिवारी हे अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी पुणे शहरात आले होते. त्यावेळी तपासाच्या संबंधीत तपशील देण्यासाठी अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनी अभिषेक तिवारींना आयफोन-12 प्रो दिला होता, असे सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये दाखल केले आहे.


अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुली  जे आरोप लागले होते त्याचा तपास करणार्‍या पथकामध्ये अभिषेक तिवारी सुद्धा होता. तर अनिल देशमुखा यांच्या वकिलांच्या टीमचे आनंद डागा हे एक वकील आहेत. अभिषेक तिवारी तपासासाठी पुण्यात ये-जा करत होता. पुण्यात अभिषेकची भेट अॅडव्होकेट आनंद डागाशी झाली. आनंद वारंवार अभिषेकशी संपर्कात होता. आनंदने अभिषेकला लाखोंच्या किमतीचा आयफोन भेट म्हणून दिलं होतं. तसेच या पथकातील इतर अधिकाऱ्यांची सुद्धा ओळख करून देण्याचा आग्रह आनंदने अभिषेककडे केला होता. आनंदने अभिषेकला वारंवार महागडे वस्तू भेट दिल्याचा सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाला आहे.


सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक तिवारी यांच्याकडून तो आयफोन जप्त करण्यात आला असुन, तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तिवारी यांनी अनिल देशमुखांच्या वकीलाकडून अनेकवेळा लाच घेतली होती असा सीबीआयचा आरोप आहे. तसेच सीबीआयने अनिल देशमुख प्रकरणातील तपास अधिकारी म्हणून प्रकरणाचे तपशील अभिषेक तिवारी यांच्याकडे देण्यात आले होते, मात्र त्यांनी हे तपशीलांचा गैरवापर करण्याचा गुन्हा केला आहे. दरम्यान, अभिषेक तिवारी सीबीआयचे उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. अनिल देशमुख तपासाचा अहवाल लीक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांकडून लाच घेतल्याचा त्यांचावर आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक तिवारी अनिल देशमुख यांच्या वकिलाच्या संपर्कात होते. या प्रकरणीच अनिल देशमुख यांच्या वकिलांनाही अटक केली आहे.