चंद्रपूर : चंद्रपुरात एका अनुसूचित जातीच्या वस्ती सुधार कार्यक्रमाच्या निमित्ताने झोपडपट्टी भागात आलेल्या केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि स्थानिक भाजप आमदार नाना शामकुळे यांना महिलांनी घेराव घातला. भाजपचे स्थानिक नगरसेवक या भागाकडे लक्ष देत नसून केवळ फोटो लावून हौस भागवत असल्याचे महिलांनी सांगितलं. अहिर-शामकुळे यांना महिलांनी विचारलेल्या जाबाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. या प्रसंगानंतर संतापलेल्या महिलांचा रोष पाहून मंत्री-आमदारांनी निघून जाणेच पसंत केलं. लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागताच लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमांना बुलेट ट्रेनची गती आली आहे. चंद्रपूर शहरात कामगार झोपडपट्टी भागात अशाच एका धडाकेबाज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या भागात लक्षावधी रुपये खर्चून 10 सिमेंटच्या रस्त्यांच्या भूमिपूजनचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि स्थानिक खासदार हंसराज अहिर, स्थानिक भाजप आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. रस्त्यांच्या भूमिपूजनचा कार्यक्रम पार पडल्यावर स्थानिक महिलांनी इथल्या विविध समस्यांबाबत मंत्री -आमदारांना जाब विचारला. या भागाकडे स्थानिक भाजप नगरसेवक अजिबात लक्ष देत नसून ते केवळ बॅनरवरील फोटोपुरते उपस्थिती दर्शवितात अशी तक्रार महिलांनी मंत्र्यांसमोर केली. स्थानिक नगरसेवकांच्या अकार्यक्षमतेचा फटका मंत्री आणि आमदारांना बसला. अहिर यांनी काही काळ महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिला अधिक आक्रमक झाल्याने अहिर आणि आमदार-महापौरांनी काढता पाय घेणेच पसंत केले. सध्या चंद्रपुरात हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या भागातील काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचे फोटो कार्यक्रम बॅनरवरुन बेपत्ता असल्याने हा प्रकार घडवून आणण्यात आल्याचीही चर्चा आहे.