मुंबई : आज राज्यभरात अंगारकी संकष्टी साजरी केली जात आहे. वर्षभरातील ही शेवटची अंगारकी संकष्टी असल्यामुळे भाविकांनी गणेश मंदिरांमध्ये सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे.

2018 या वर्षात तब्बल तीनवेळा अंगारकी संकष्ट चतुर्थी आली आहे. मंगळवारी येणाऱ्या संकष्टीदिवशी अंगारक योग समजला जातो. भाविक या संकष्टीची आतुरतेने वाट पाहात असतात.

आज वर्षातील तिसरी आणि शेवटची अंगारकी संकष्टी असल्याने तसंच ख्रिसमसची सुट्टी असल्याने भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत.

अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाचरणी भाविक लीन

मुंबईतील सिद्धीविनायक हे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. आज अंगारकी संकष्टीनिमित्त आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सोमवारपासूनच रांग लावली होती. आज सकाळी साडेतीन वाजता काकड आरती झाल्यानंतर दर्शन खुले करण्यात आले. अंगारकीनिमित्त मंदिराला विशेष सजावट करण्यात आली आहे. रोषणाईदेखील करण्यात आली आहे. मंदिरात केवळ गणपती बाप्पा मोरयाचा नाद घुमत आहे. मंदिरात कडेकोट सुरक्षादेखील करण्यात आली आहे.

गणपतीपुळ्यात भाविकांची रीघ

त्यातली ही शेवटची अंगारकी संकष्ट चतुर्थी असल्याने  रत्नागिरीतल्या प्रसिद्ध अशा गणपतीपुळेत श्रींच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत.

अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने गणरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक सध्या गणपतीपुळ्यात दाखल झाले आहेत. जवळपास तीन लाख भाविक गणपतीपुळ्यात आलेत. आज पहाटे तीन वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आलंय.

दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला भक्तांच्या रांगा

आज वर्षातील शेवटची अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी  पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली. सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून भक्तांनी मंदिरातील श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सुरुवात केली. अंगारकीनिमित्त दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्यावतीने मंदिरात फुलांची आरास करण्यात आली. यामध्ये 6 हजार किलो फुले वापरण्यात आली आहेत. झेंडू ,शेवंती आणि गुलाब फुलांची आकर्षक आणि मनमोहक सजावट मंदिरावर आणि मंदिरात करण्यात आली.

राजूरमध्येही अंगारकीनिमित्त भाविकांची गर्दी

मराठवाड्यातील प्रसिद्ध गणपती असलेल्या जालना जिल्ह्यातील राजूर गणपतीला आज अंगारकीनिमित्त गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. गणपतीच्या साडेतीन पीठापैकी अर्धपीठ म्हणून राजूरच्या राजुरेश्वर गणपतीला विशेष महत्व आहे.

दरवर्षी अंगारकीनिमित्त विदर्भ मराठवाड्यातील अनेक भाविक पायी चालत गणेशाच्या दर्शनाला येतात. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मध्यरात्री 12 च्या सुमारास राजूरमध्ये श्रींची आरती होते. सकाळी अभिषेक करुन बाप्पांची विधीवत पूजा देखील या ठिकाणी होते.

अहमदनगरमध्येही भाविकांची मांदियाळी

अंगारकी संकष्टीनिमित्त आज सर्वत्रच गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. अहमदनगरचं ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपती मंदिरातदेखील भाविकांची गर्दी झालेली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हे विशाल गणपती मंदिर असून दोन्ही हाताने भक्तांना आशीर्वाद देणारी 15 फूट उंचीची मोठी गणेश मूर्ती आहे.

सांगलीतही अंगारकी संकष्टीचा उत्साह

वर्षातील शेवटची अंगारकी संकष्टी असल्याने सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या आणि दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे गणपती मंदिर असलेल्या गणपती पंचायतन संस्थानच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासून लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. वर्षाची शेवटची अंगारकी असल्यामुळे आज गणपती मंदिरात तुडूंब गर्दी दिसून येत होती.