Anganewadi Bharadi Devi Jatra 2022 : कोरोनाच्या संसर्गामुळे मर्यादित झालेली कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा आज होणार आहे. दोन वर्षानंतर यात्रा सर्वांसाठी खुली झाल्याने भाविकांची गर्दी उसळणार असल्याचा अंदाज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविकांना कोव्हिड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
मागील वर्षी कोव्हिडचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाल्याने यात्रा मर्यादित स्वरुपात आणि साधेपणाने साजरी करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाच्या लाटेचा जोर कमी झाल्याने आणि लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने यात्रा निर्बंधासह होणार आहे. यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
कोव्हिड नियमांचे पालन करा
आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला जाणार असाल तर तुम्हाला सोशल डिस्टेंसिंगचे नियम पाळावे लागणार आहेत. दुकानदार व व्यापाऱ्यांच्या संख्येवर ही मर्यादा घातल्या गेल्या आहेत. दोन डोस घेतलेल्यांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच एका वेळी ५० व्यक्तींना अश्या पद्धतीने दर्शन देण्याच्या सूचना प्रशासनाने आंगणे कुटुंबियांना दिल्या आहेत.
अशी ठरते यात्रेची तारीख
कोकणात जत्रा म्हटलं की उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. कोकणातील गावागावात वर्षाच्या ठराविक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र भराडी देवीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही, कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. ही तारीख ठरवण्याची प्रथाही उत्सुकतेची आहे. दिवाळीत शेतीची कामं झाली की आंगणेवाडीतील देवीचे मानकरी एका डाळीवर बसतात. यालाच डाळप स्वारी म्हणतात. देवीला कौल लावला जातो. कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित केला जातो. एकदा निश्चित झालेली तारीख कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही हे सुद्धा आंगणेवाडी यात्रेचे वैशिष्ट्य आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha