Anand dave On Rahul Gandhi :  राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा सगळीकडून टीका होताना दिसत आहे. यात हिंदू महासंघाने भर घातली आहे. राहुल गांधींना अंदमानला पाठवण्याचा प्लॅन हिंदू महासंघाकडून करण्यात आला आहे. राहुल गांधींसाठी अंदमानला जाण्याची आणि येण्याची विमानाची तिकिटं काढली आहेत आणि त्यांची राहण्याची व्यवस्थादेखील केली आहे. त्यांनी अंदमानला जाऊन सावकरांचा त्याग अनुभवावा आणि नंतर स्वातंत्र्यवीर सावकरांवर टीका करावी, असा हल्लाबोल हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. 


हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, राहुल गांधी हे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करत असतात त्यांना नावं ठेवत असतात. सावरकरांवर टीका केली की आपल्याला प्रसिद्धी मिळते असं त्यांना माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सावरकरांचा विषय लावून धरला होता. त्यांना सावरकर माहित नाही त्यांना इंदिरा गांधी माहित नाही आणि त्यांना महात्मा गांधीदेखील माहित नाही, असा आरोप हिंदू महासंघाने केला आहे. 


त्या काळात इंदिरा गांधींनी त्यांच्या खात्यातले 11 हजार रुपयांची देणगी सावकरांनी दिली होती. भारत मातेचा सुपुत्र असा त्यांनी पत्रामध्ये उल्लेख केला होता. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या हयातीत सावरकरांच्य़ा नावाची पोस्टाची तिकीटदेखील काढली होती. महात्मा गांधींनी वीर सावकरांना एक पत्र लिहिलं आहे. त्यात सावकरांचं कार्य राजकीय आहे. त्यात मी माझ्या कुवतीने मदत करणार आहे, असं लिहिलं आहे, असं आनंद दवे यांनी सांगितलं आहे.


इतिहास आणि या सगळ्या गोष्टी माहित नसलेले राहुल गांधी फक्त प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करत आहे. एका विशिष्ठ वर्गाला खूश करण्यासाठी ते हे काम करत आहे. आम्हाला गांधींविषयी तेवढाच आदर असून तर आमच्या श्रद्धास्थानावर टीका करत असाल आणि टार्गेट करत असाल तर आम्हालाही आक्रमक भूमिका घेतल्या शिवाय पर्याय नसल्याचं दवे म्हणाले. 


आम्ही गांधींवर पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग लिहिले आहे. पंचतारांकीत हॉटेलसारखी सोय असणाऱ्या ठिकाणी त्यांची अटक होणं. आगा खान पॅलेस आणि बिरला मंदिराचाही त्यात उल्लेख आहे. हे पुस्तक राहुल गांधींनी वाचावं. त्यानंतर त्यांना महात्मा गांधींची नाटकंही कळतील आणि सावकरांचा त्यागही कळेल, असाही हल्लाबोल त्यांनी राहुल गांधींवर केला आहे.