Chhatrapati Sambhaji Nagar News : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावरून ठाकरे गट आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान संजय शिरसाट यांच्याच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात आज त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शिरसाट यांच्या विधानामुळे ठाकरे गटाच्या महिला आघाडीमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे ठाकरे गट शिवसेना महिला आघाडीच्यावतीने छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध आज जोरदार निदर्शने करण्यात आली. तर शिरसाट यांच्या फोटोला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. 


शिंदे गट शिवसेनेच्या वतीने रविवारी शहरातील संत एकनाथ रंग मंदिरात पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषण करताना संजय शिरसाठ यांनी सुषमा अंधारे यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून ठाकरे गटात महिला आघाडी संतप्त झाली असून, रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज जोरदार निदर्शने करण्यात आले. ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक महिलांनी संजय शिरसाठ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आणि प्रतिमेला शेण खाऊ घालत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी संजय शिरसाठ यांचे करायचे काय,खाली मुंडकं वर पाय.... मिंधे सरकार हाय, हाय, ….शिंदे सरकार करायचं काय,खाली मुंडके वर पाय, अशा घोषणा देण्यात आल्या. 


शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी...


दरम्यान शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. पोलिसांनी पाठवलेल्या पत्रात दानवे यांनी म्हटले आहे की, विद्यमान आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ताई यांच्या विरोधात अत्यंत अर्वाच्य भाषेत टीका केली आहे. शिरसाट यांनी उद्गारलेले शब्द निश्चितपणे स्त्री मनास लज्जा उत्पन्न करून त्यांचा अपमान करणारे आहेत. त्यामुळे संजय शिरसाठ यांच्या विरोधात भा. दं. वि. च्या कलम 354 (अ) (1) (iv), 509,500 प्रमाणे गुन्हा दाखल करणे बाबत कायदेशीर फिर्याद आहे. माझी प्रस्तुत तक्रार, फिर्याद हीच माझा जवाब समजून गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Tanaji Sawant : बंडासाठी मी तब्बल दीडशे बैठका केल्या, फडणवीसांच्या आदेशानेच बंडाला सुरुवात; तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट