सोलापूर : अवघ्या काही महिन्यात सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्य़ासाठी राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात पक्षाची बांधणी करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या रुपाने राष्ट्रवादीचा पालकमंत्री जिल्ह्याला मिळाल्यानंतर शहरातील राष्ट्रवादीत नवीन उर्जा निर्माण झाली. तेव्हा पासून राष्ट्रवादीत अनेक जण प्रवेश करु पाहतायत.
शिवसेनेचे नेते महेश कोठे, एमआयएमचे नेते तौफीक शेख यांच्यानंतर आता वंचित बहूजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोरात सुरु आहेत. अशात आनंद चंदनशिवे यांनी सहकारी नगरसेवक गणेश पुजारी, रविकांत कोळेकर यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली आहे. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते. शहरातील विविध अडचणी आणि समस्यांबाबत आपण उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे मत आनंद चंदनशिवे यांनी या भेटीनंतर व्यक्त केले. मात्र मागील काही दिवसांपासून चंदनशिवे यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतचा वावर पाहताना ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मागील अनेक महिन्यांपासून पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते महेश कोठे हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. महेश कोठे हे कित्येक वेळा राष्ट्रवादीच्या मंचावर उघडपणे दिसून आले आहेत. मात्र राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघेही सत्तेत एकत्रित असल्याने अद्याप तरी महेश कोठे यांचा राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश झालेला नाही.
तर दुसरीकडे मागच्या वेळी महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमने ज्यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय प्राप्त केला होता. ते एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख हे देखील आपल्या सहाकारी नगरसेवकांसह राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा आहे. तौफीक शेख यांच्यावर काही महिन्यांपूर्वी हत्येच्या आरोपातून विजयापूर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर एमआयएमने त्यांच्याकडून शहराध्यक्ष पदाची जबाबदारी काढून घेतली. तेव्हापासून पक्षावर नाराज असेलेले शेख हे राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार असल्याच्या चर्चा आहेत. तौफीक शेख यांनी देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.
आता वंचित बहूजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश कऱणाऱ असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आनंद चंदनशिवे हे सोलापूर महानगरपालिकेत बहूजन समाज पार्टीच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र सोलापूर लोकसभा निवडणुकांच्यावेळी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचा सोलापूरातील प्रमुख चेहरा म्हणून आनंद चंदनशिवे यांच्याकडे पाहिलं जातं. अवघ्या काही दिवसात वचिंतच्या प्रदेश प्रवक्ता पदावर देखील निवड करण्यात आली.
सोलापुरात मोठ्या प्रमाणात बहुजन समाज आहे. आनंद चंदनशिवे यांच्या रुपाने बहुजन समाजाचा एक चेहरा राष्ट्रवादीला मिळू शकतो. तसेच आनंद चंदनशिवे हे पालिकेत सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्तेत असतात. विविध विषयांवर आंदोलन करत असतात. त्यामुळे आनंद चंदनशिवे यांच्या रुपाने एक आंदोलक चेहरा राष्ट्रवादीला मिळू शकेल. असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे. येणाऱ्या पालिकेच्या निवडणूक काय उलाथापालथ होईल हे येणारा काळच सांगू शकेल.