An oil tanker suddenly fell straight down from a flyover : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावरून रॉकेलने भरलेला टँकर कोसळला. रस्त्यावर कोसळताच ट्रकने पेट घेतला. ही घटना पालघरमधील मनोर परिसरातील मसान नाक्याजवळ रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर रस्त्यावर एकच गोंधळ उडाला आणि लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

टँकर वीस फूट उंचीवरून टँकर कोसळला 

घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचा टँकरवरील ताबा सुटला, त्यामुळे अनियंत्रित टँकर उड्डाणपुलाच्या काठावर जाऊन आदळला आणि वीस फूट उंचीवरून थेट पुलाच्या खाली सर्व्हिस रोडवर पडला आणि टँकरने लगेच पेट घेतला.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग दोन तास बंद

घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. अपघातामुळे महामार्ग २ तास बंद होता. यानंतर महामार्ग पुन्हा खुला करण्यात आला. सध्या या अपघाताची चौकशी सुरू असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. टँकर चालकाचे नियंत्रण सुटले आणि आग कशी लागली याचा तपास करण्यात येत आहे. संपूर्ण अहवाल लवकरच समोर येईल.

आग्रा-दिल्ली महामार्गावर दोन ट्रकची धडक, एका चालकाची प्रकृती गंभीर

दरम्यान, आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर मथुरा येथे भीषण अपघात झाला. जय गुरुदेव मंदिराजवळ पहाटे दोन ट्रकची धडक झाली. कोलकाताहून दिल्लीकडे रसायन घेऊन जाणाऱ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की ट्रक दुभाजकावर गेला. या अपघातात ट्रक चक्काचूर झाला. कँटरमध्ये भरलेले केमिकल रस्त्यावर विखुरले. चालकाला गंभीर दुखापत झाली.

ट्रकचालक रोहित कुमारने सांगितले की, तो कोलकाताहून दिल्लीला रसायन घेऊन जात होता. मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. मागच्या ट्रकच्या चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन ट्रॅकमध्ये धडक झाल्यानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने दोन्ही ट्रक महामार्गावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

इतर महत्वाच्या बातम्या