सोलापूर : सध्या सलग सुट्ट्या आहेत. त्यामुळं लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी आहे. पंढरपूर ओवरपॅक झालं आहे.  विठुरायाच्या दर्शनाची रांग थेट चंद्रभागातिरावरील सारडा भवनपर्यंत पोहोचली आहे. दर्शनरांग लांब असल्यानं खाली मॅट नसल्याने भाविकांचे पाय उन्हामुळं भाजत आहेत. डोक्यावर असणारा सूर्य देव आग ओखत आहे.

एका बाजुला उन्हाचा कडा असून दुसऱ्या बाजुला दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी देखील पुरवले जात नसल्याने याबाबत भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. देवाच्या दर्शनाला जायचे आहे त्यामुळे पाय भाजणे किंवा घसा कोरडा पडला तरी तक्रार कोणाकडे करावी शेवटी देवाचे दर्शन महत्त्वाचे आहे. त्यामुळं हा त्रास सोसावाच लागेल अशा प्रतिक्रिया संतप्त भाविकांकडून दिल्या जात आहेत. शनिवार त्यानंतर आलेला गुढीपाडवा आणि आजची रमजान ईद अशा मिळालेल्या सलग सुट्ट्यांमुळं देशभरातील हजारो भाविक, पर्यटक सध्या विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आलेले आहेत. मात्र दर्शन रांगेतील भाविकांना या कडाक्याच्या उन्हात पाय भाजू नयेत यासाठी जी खबरदारी घ्यायला हवी ती मंदिर समितीकडून घेतली गेलेली नाही. दर्शन रांगेत काही ठिकाणी जुने मॅच चे तुकडे टाकले असून ठीक ठिकाणी पाय भाजत भाविकांना रांगेतून पुढे सरकावे लागत आहे. यातच पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय रांगेत नसल्याने भाविक हैराण झाली आहेत. दर्शन रांगेत लहान मुले वृद्ध असे अनेक भाविक असल्याने यांना पाय भाजतच देवाकडे जावे लागत आहे.     दरम्यान, याबाबत वारंवार एबीपी माझा ने हे वास्तव समोर आणूनही मंदिर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. वास्तविक दर्शन रांगेसाठीचा ठेका मंदिर समितीने दिलेला असला तरी हा ठेकेदार काय करतोय याबाबत प्रशासन डोळे मिटून शांत आहे. आता तरी प्रशासनाने जागे होऊन दर्शन रांगेत मॅट टाकून पिण्याच्या पाण्याची सोय केल्यास भाविक देवाचे सुलभ दर्शन घेऊ शकतील. 

देशातील लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत हे पंढरपुरचे श्री विठ्ठल रुक्मिणी आहे. त्यामुलं दरवर्षी या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पंढरपुरमध्ये पाहायला मिळाली. 

महत्वाच्या बातम्या:

विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये