मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील स्मारकासाठी झाडांची कत्तल होणार असल्याचं वृत्त येताच, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय. प्रियदर्शनी मैदानात होणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हजारो झाडांची कत्तल होणार, असं समजताच अमृता फडणवीसांनी शिवसेनेला ढोंगी म्हणत, दलालीचा आरोप केलाय. यानंतर शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदींनीही त्याला प्रत्युत्तर दिल आहे. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कोणतीही वृक्षतोड होणार नसल्याचं प्रियंका चतुर्वेदींनी स्पष्ट केल आहे.


अमृता फडणवीस यांनी ट्वीट करुन शिवसेनेवर टीका केली आहे. औरंगाबाद येथे दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होत आहे. त्यासाठी, शिवसेना 1 हजार झाडं तोडणार आहे. त्यावरुन Get Well Soon शिवसेना असे म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. हे फक्त कमिशनसाठी सुरू आहे. शिवसेनेचा ढोंगीपणा यातून समोर येतो असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.


शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदींनीही  अमृता फडणवीस यांच्या ट्वीटरला प्रत्युत्तर दिल आहे. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कोणतीही वृक्षतोड होणार नसल्याचं प्रियंका चतुर्वेदींनी स्पष्ट केल आहे.


महाराष्ट्र विकास आघाडीने सत्ता स्थापन केली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर, पहिल्यांदाच अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर थेट टीका केली. यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटवरुन एक शायरी व्यक्त केली. शायरीतून आपला मत मांडताना पलट के आऊंगी, मौसम जरा बदलने दे... असे म्हणत मी पुन्हा येणार असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच, महाराष्ट्रानं मला गेल्या 5 वर्षे वहिनी म्हणून जे प्रेम दिलं, त्याबद्दल महाराष्ट्राचे आभार. मी गेली 5 वर्षे माझी भूमिका माझ्या क्षमतेनुसार निभावली आहे, असे त्यांनी म्हटलं होतं.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयीची माहिती
प्रकल्पाचा एकूण खर्च - 64 कोटी
उद्यानाचा परिसर - 17 एकर
पुतळ्यासाठी जागा - 1 हजार 135 चौरस मीटर
फुड पार्कसाठी जागा - 2 हजार 330 चौरस मीटर
म्युझियमसाठी जागा - 2 हजार 600 चौरस मीटर
ओपन एअर स्पेस - 3 हजार 690 चौरस मीटर

प्रियदर्शनी उद्यानात हे सगळं उभं करायचं असेल तर किमान पाच हजार झाडं तोडावी लागतील, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. या मनमानीविरुद्ध पर्यावरण प्रेमींनी आवाज उठवला आहे. ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून सकारात्मक आंदोलन सुरु झालं आहे. 6 वर्षांच्या मुलांपासून ते साठीतले आजोबाही झाडं वाचवण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, उद्यान विभागाच्या कृपेनं भर उन्हात झाडं पाण्याअभावी काळी पडत होती, मरत होती. हे पाहून पर्यावरणप्रेमींनी वॉक अँड वॉटर (#WalkAndWater) हा अभिनव उपक्रम हाती घेतला. त्यामुळे अनेक झाडं वाचली.

दरम्यान, याप्रकरणी जनहित याचिका दाखल झाल्यानंतर मनपाने दुष्काळाचे कारण देत झाडं कमी झाल्याचे स्वतःच मान्य केले. पण याच कथित पाणी टंचाईच्या तीन वर्षांच्या काळात उद्यान विभागाने शहरात 66 हजार 69 झाडं लावली कशी? असा सवाल उपस्थित झाला आहे.

उद्यानातील झाडं कमी होण्याचे टप्पे (उद्यानात सुरुवातीला एकूण 10 हजारहून अधिक झाडं होती)

12 जानेवारी 2016 - उद्यानात 9 हजार 885 झाडांची नोंद
30 नोव्हेंबर 2019 - उद्यानात 8 हजार 970 झाडांची नोंद
कमी झालेल्या झाडांची संख्या - 1 हजार 225 झाडे
गेल्या तीन वर्षात उद्यान विभागाने लावलेली झाडे - 0

स्थानिक लोकांनी, पर्यावरण प्रेमींनी भर उन्हाळ्यात स्वतः पाणी घालून झाडं वाचवली, पावसाळ्यात लहान-मोठे बांधारे बांधले, स्वच्छता केली तरिही पालिकेला पाझर फुटला नाहीच. याउलट पालिकेने हे उद्यान दारुडे, गर्दुल्ले, नशेखोरांच्या हवाली केलं आहे. लोकांनी वर्गणी काढून दुरुस्त केलेले उद्यानाचे कुंपण गर्दुल्ल्यांनी तोडलं आहे.