अमरावती : अमरावतीतील 'आक्रमण संघटने'च्या महिला प्रमुख शीतल पाटील यांची हत्या अॅडव्होकेट सुनील गजभिये आणि रहमान पठाण यांनीच केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. प्रेमसंबंधातून शीतल यांची हत्या झाल्याचा संशय आहे.
शीतल आणि आरोपी सुनील हे दोघेही 'आक्रमण संघटना' चालवत होते. शीतल पाटील यांची 13 मार्चला हत्या झाली होती, तर 16 मार्चला त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
सुनील आणि शीतल यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते, मात्र गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये अनेक खटके उडत होते. चालत्या गाडीत सुनीलने रहमानच्या साथीनं शीतल यांच्या डोक्यावर वार केले. हत्येनंतर दोघांनी शीतल यांचा मृतदेह विहिरीत फेकून दिला, अशी माहिती अमरावतीचे पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली.
हत्येच्या दिवसापासून सुनील आणि रहमान फरार होते. सुनील 23 तारखेला स्वतः न्यायालयात हजर झाला. सुनील गजभिये आणि रहमान पठाण यांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलं. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या दोघांनीच हत्या केल्याचं उघड झालं.