Amravati News Update : भाजपच्या ( BJP ) कार्यकर्त्यांनी भाजपच्याच जिल्हाध्यांविरोधात तक्रार केली आहे. कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून जिल्हाध्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. निवेदिता चौधरी असे गुन्हा दाखल झालेल्या अमरावीतच्या भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांचे नाव आहे. तर चेतन राजकुमार पुरोहित  असे तक्रार दाखल केलेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. 


अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे काल कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत शिवीगाळ केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या कार्यकर्त्यांनी चौधरी यांच्या विरोधात परतवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौधरी यांच्यावर 295 अ कलमा अन्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. निवेदिता चौधरी यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल झाल्याने त्यांना केव्हाही पोलीस अटक करू शकतात. 


पुरोहित यांनी परतवाडा पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, परतवाडा शहरात भाजपच्या वतीने पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अमरावती जिल्ह्यातील महत्वाचे नेते उपस्थीत होते. यावेळी जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी चेतन पुरोहित यांना पाहून ब्राह्मण समाजाविषयी अश्लिल शिवीगाळ केली. त्यांच्या बोलण्यात ब्राम्हण समाजाविषयी चिड, व्देष आणि अपमानाची भावना होती. त्यांच्या वक्तव्याने माझ्यासह ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. पुरोहित यांच्या तक्रारीवरुन परतवाडा पोलिसांनी निवेदिता चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे तक्रार देतेवेळी भाजपच्याच सात कार्यकर्त्यांचा साक्षीदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.  


दरम्यान, चौधरी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या विरोधात तक्रार देण्यात आली याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. माझं जीवन हे संघर्षांचं आहे. त्यामुळे मी अशा गोष्टींकडे फार लक्ष देत नाही. हे सगळं का आणि कोण करतंय हे कळायला मार्ग नाही, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी फोनद्वारे दिली आहे.


महत्वाच्या बातम्या


Raj Thackeray FIR : तोंडात बोळा कोंबा ते अभी नही तो कभी नही, पोलिसांच्या FIR मधील शब्द आणि शब्द जसाच्या तसा


Raj Thackeray : औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल; राज ठाकरेंसमोर आता पर्याय काय?