Amravati news: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ( Mukhyamantri Ladki Bahin Yojna) अर्जावर अमरावतीच्या मोर्शी वरुडचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar)यांनी स्वतःचे छायाचित्र टाकत मतदार संघातील अंगणवाडी सेविकांकडून वाटून घेतल्याचा प्रकार समोर आलाय. आमदार भूयार यांनी केलेल्या कारभारवरून भाजपसह काँग्रेसनेही आक्रमक झाल्याचे दिसत आहे.


देवेंद्र भुयार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपसह काँग्रेसनेही केली आहे. या प्रकाराबाबत तहसीलदारांना जाब विचारण्यात आला आहे. त्यामुळे आमदार देवेंद्र भुयारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


स्वतःचा फोटो टाकत योजनेचे अर्ज खाजगीत घेतले छापून


देवेंद्र भूयार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे स्वतःचा फोटो असलेले अर्ज खाजगीत छापून घेतले आहेत. या अर्जावर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री, राजमुद्रा टाकण्यात आलेली आहे. तसेच या अर्जावर या योजनेचा अध्यक्ष मीच असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी दाखवले आहे. तहसीलदारांचा सचिव म्हणून उल्लेख असल्याचे पाहायला मिळतेय.


भाजपसह काँग्रेसही आक्रमक


अमरावतीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर स्वतःचा फोटो टाकत केलेल्या या प्रकारावर भाजपसह काँग्रेस पक्ष ही आता आक्रमक झालाय. 
भाजप आणि काँग्रेसने या प्रकरणाचा तहसीलदारांना या संदर्भात जाब विचारलाय. त्यानंतर तहसीलदार रवींद्र चव्हाण यांनी देवेंद्र भुयार यांनी छापलेल्या फॉर्मचे वितरण बंद करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्यात अशी माहिती आहे.


आमदार देवेंद्र भुयार यावर काय म्हणाले?


तर दुसरीकडे आमदार देवेंद्र भुयार यावर म्हणाले की, काँग्रेस वाल्यांना ही योजना कशी फेल होईल त्यासाठी जाणून बुजून महिलांचे अर्ज बाद व्हावा, याचा फायदा मिळू नये म्हणून काही विघ्न संतोषी लोकं अपप्रचार करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.


हेही वाचा:


Chhatrapati Sambhajinagar Crime: सावधान! लाडकी बहीण योजनेचा लाभ मंजूर करते म्हणून महिलेने उकळले पैसे, महिलेवर गुन्हा दाखल