अमरावती : अमरावतीत डीजे लावण्याच्या कारणावरुन कुटुंबाला मारहाण करणाऱ्या चार पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. डीजे सुरु ठेवण्यासाठी पोलिसांनी 5 हजार रुपये मागितले, मात्र ते देण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याचा आरोप तिवारी कुटुंबियांनी केला होता. पोलिसांनी तिवारी कुटुंबाला केलेली अमानुष मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली होती. यानंतर चार पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे, तर 5 पोलिसांची बदली करण्यात आली आहे. अमरावती शहरातील बिल्डर राजू तिवारी यांच्या मुलाचा 22 ऑक्टोबरला वाढदिवस साजरा केला जात होता. त्यावेळी डीजे वाजवण्याच्या कारणावरुन तिवारींचा पोलिसांशी वाद झाला. पोलिसांनी डीजे चालू देण्यासाठी लाच मागितली, ती दिली नाही म्हणून मारहाण करण्यात आली, असा आरोप तिवारी कुटुंबाने केला होता.

डीजे वाजवण्याचा वाद, पोलिसांची महिला, वृद्धांना अमानुष मारहाण

प्रकरण काहीही असो, पोलिसांना दंडात्मक कारवाई करता आली असती. मात्र असं न करता थेट पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याने संताप व्यक्त करण्यात आला होता. अमरावती पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात शहरात संताप व्यक्त केला जात होता. पोलिसांनी मारहाण करताना वृद्ध असो किंवा महिला, कुणालाही सोडलं नाही. या मारहाणीमध्ये 8 जण गंभीर जखमी झाले होते. तर मनिष अहिरे यांचं 3 ठिकाणी हाड तुटलं आहे. धक्कादायक म्हणजे ज्या तिवारी कुटुंबाला मारहाण करण्यात आली, त्या तिवारी कुटुंबाचे प्रमुख राजू तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांच्या तडीपारीचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. पाहा व्हिडिओ (1 नोव्हेंबर 2017) :