अमरावती : 19 वर्षांची अमरावतीतील तरुणी मरणाच्या दारातून परत आली. जन्मदात्या बापानंच तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. कारण काय, तर दुसऱ्या जातीतील तरुणावर तिचा जीव जडला.
बाहेरच्या जातीतील तरुणावर असलेलं तिचं प्रेम कुटुंबियांना मान्य नव्हतं. त्यामुळे कुटुंबियांनी तिच्या हत्येचा कट रचला. मामा आणि वडिलांनी तिला चिखलदऱ्याच्या डोंगरातून दरीत फेकलं.
तिचं दैव बलवत्तर म्हणून झाडाला अडकल्यामुळे ती बचावली. गस्तीवर असलेल्या वनरक्षकानं तिला पाहिलं. त्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं.
खरं तर ही तरुणी सज्ञान आहे. तिला तिच्या आवडीनुसार प्रियकर, किंबहुना आयुष्याचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य इथला कायदा देतो. पण खोट्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
कायम पुरोगामित्वाचा डंका पिटणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी घटना आहे. पोटच्या पोरीचा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांना शिक्षा व्हायलाच हवी, अशी मागणी केली जात आहे.