Independence Day 2022 : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. शिंदे गटातील 9 आणि भाजपच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. स्वातंत्र्य दिनाला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री ध्वजारोहण करण्याची शक्यता होती. मात्र, खातेपाटप लांबला आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यासाठी प्रत्येक मंत्र्यांना जिल्हा देण्यात आलेला आहे. 19 जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांच्या खांद्यावर असेल तर उर्वरित ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करणारे मंत्रीच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे. यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, पण याच मंत्र्यांच्या खांद्यावर त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद येण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यामध्ये मंत्री करणार ध्वजारोहण ?
देवेंद्र फडणवीस - नागपूर
सुधीर मनगुंटीवार - चंद्रपूर
चंद्रकांत पाटील - पुणे
राधाकृष्ण पाटील - अहमदनगर
गिरीष महाजन - नाशिक
दादा भुसे - धुळे
गुलाबराव पाटील - जळगाव
रविंद्र चव्हाण - ठाणे
मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर
दीपक केसरकर - सिंधुदुर्ग
उदया सामंत - रत्नागिरी
अतुल सावे - परभणी
संदीपान भुमरे - औरंगाबाद
सुरेश खाडे - सांगली
विजयकुमार गावित - नंदुरबार
तानाजी सावंत - उस्मानाबाद
शंभूराज देसाई - सातारा
अब्दुल सत्तार - जालना
संजय राठोड - यवतमाळ
अमरावतीमध्ये विभागिय आयुक्त तर कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलढाणा, पालघर आणि नांदेड याठिकी तेथील जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील.
शिंदे-फडणवीस सरकारचं खाते वाटप कधी होणार?
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी (Maharashtra Cabinet Expansion) तब्बल 39 दिवस वाट बघावी लागली आणि आता दोन दिवस झाले तरी खाते वाटप होत नाही. त्यामुळे खाते वाटप कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. मलाईदार खात्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक (Cabinet Meeting) पार पडली परंतु सर्वच मंत्री हे बिन खात्याचे मंत्री म्हणून बैठकीला उपस्थित होते. ही बैठक झाल्यानंतर सर्व अधिकारी बाहेर पडले आणि फक्त मंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नव्या मंत्र्यांना सूचना दिल्या. काम करताना चुका होऊ देऊ नका, एकमेकांना सांभाळून घ्या, आमदारांना भेटा, त्यांना मानसन्मान द्या, त्यांची काम करा, लोकांची काम प्राधान्याने करा आणि विशेष म्हणजे मागच्या सरकारमध्ये आमदरांना सन्मान मिळत नव्हता, मंत्री भेटत नव्हते, या सरकारमध्ये तसं होऊ देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या.