Amol Mitkari on Jitendra Awhad : माझं कुटुंब सोडून पवार घराण्यातील सर्वजण माझ्याविरोधात प्रचार करतील, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांवर हल्लाबोल केला. यावरून अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जितेंद्र आव्हाडांचा चांगलाच समाचार घेतला आहे.  


अमोल मिटकरी म्हणाले की, जितेंद्र आव्हाड चळवळीच्या नावाखाली भामटेगिरी करणारी व्यक्ती आहे. हा भामटा माणूस आहे. या माणसाला माझे आव्हान आहे की, जर तुमच्यात हिंमत असेल तर अजित दादांनी महाराष्ट्रासाठी काय केले. यावर एकदा खुली चर्चा होऊद्या. उतराला उत्तर त्याच भाषेत दिले जाईल. अन्यथा जाहीर माफी मागा. ज्या पद्धतीने अजित दादांवर तुम्ही बोलतायेत, त्यांच्या उपकाराखाली तुम्ही जगलात. त्यांच्या टाचेखाली जगलात. तुमची जहागिरी गेली आता तुमची भामटेगिरी सुरु आहे. 


मुंब्रा कळव्यातील जनता आव्हाडांची फुगिरी लवकरच काढणार


जितेंद्र आव्हाडांच्या सडक्या मेंदूतील हे विषारी विचार आहेत. पुरोगामी आणि चळवळीच्या नावाखाली हा माणूस काय चाळे करतो.  ज्या ज्या वेळेस या माणसावर खालच्या पातळीचे आरोप झाले त्या त्या वेळेस हाच अजित दादा या माणसाच्या पाठीशी होता. आव्हाडांची जहागिरी गेलेली आहे. फुगिरी तेवढी बाकी आहे.  मात्र मुंब्रा, कळवा, ठाण्यातील जनता जितेंद्र आव्हाडांची फुगिरी लवकरच काढणार आहे, असे त्यांनी म्हटले. 


अजित पवार महाराष्ट्राला दिशा देणारे नेते


मला माहित आहे आव्हाडांचे पोसलेले गुंड, वेगवेगळ्या नंबरवरून आम्हाला धमक्या देतात. पण आम्हीही आता त्या पद्धतीने उत्तर द्यायला तयार आहोत. अजित पवार हे आव्हाडांसारखा बोल घेवडा व्यक्ती नाही. ते कृतीशील आहेत. महाराष्ट्राला दिशा देणारे नेते आहेत. अजित पवारांनी आपल्या कृतीतून ते सिद्ध केले आहे. त्यामुळे चळवळीच्या नावाखाली वळवळ करणाऱ्या आव्हाडांनी आपले तोंड वेळीच आवरावे. अन्यथा जशाच तसे उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. आव्हाडांमध्ये खरंच हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर येऊन खुली चर्चा करावी, आता मुंब्रा कळव्यातून निवडून कसा येतो तेच पाहतो आम्ही, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.


काय म्हणाले जितेंद्र आव्हाड


भाषणाची वेळ आली की, अजित पवार बाथरुममध्ये असायचे. तुम्हाला हिंदी-इंग्रजी बोलता येत नाही, या तुमच्या कमतरता होत्या. कधी समोर येऊन सांगितल्या नाहीत. तू शरद पवारांच्या भावाचा मुलगा होता, म्हणूनच उपमुख्यमंत्री झाला. अरे काय काका का? का म्हणजे कारखानदार, का म्हणजे कापूस, असं मी अमोल कोल्हेंना काल सांगितले होते. अजित पवार महाराष्ट्रात तुम्ही काय केलं सांगा. कोणता क्रांतीकारक निर्णय घेतला सांगा. सामान्य माणसाला तुमच्यासमोर येण्याचे धैर्य नाही. सुप्रिया सुळेंकडे प्रत्येकजण येऊन सेल्फी काढतो. तुम्हाला लोक घाबरतात, असा हल्लाबोल त्यांनी केला. 


आणखी वाचा 


निलेश राणे यांच्या ताफ्यावर चिपळूणमध्ये दगडफेक, भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर राडा