Amol Mitkari : मुंबईतील आज झालेल्या महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे. मिटकरींनी या मोर्चाला हौशा- गौश्या- नवशांची यात्रा म्हटलं आहे. या सोबतच आजचा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा असल्याचा चिमटा अमोल मिटकरींनी काढलाय. महायुती भक्कमपणे काम करत असल्यानेच महाविकास आघाडी आणि मनसे असे मोर्चे काढत असल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे. ते अकोला येथे 'एबीपी माझा"शी बोलत होते.

Continues below advertisement

विजय वडेट्टीवार आणि रोहित पवार यांनी एकदा आपल्या मेंदूची तपासणी करावी

दरम्यान, अजित पवारांच्या कर्जमाफीच्या वक्तव्यावरून होत असलेल्या टीकेचाही त्यांनी चांगलात समाचार घेतलाय. अजितदादा बारामतीमध्ये असताना आपल्या परिवाराशी बोलतात तसे त्या सभेत बोलल्याचं मिटकरी म्हणालेत.‌ यावरून काही अक्कल नसलेले लोक 'ट्वीट' करीत आपल्या बुद्धीचं प्रदर्शन करीत असल्याचं ते म्हणालेत. यावरून टीका करणाऱ्या विजय वडेट्टीवार आणि रोहित पवार यांनी एकदा आपल्या मेंदूची तपासणी करावी, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. 

चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीचे आहेत की महायुतीचे आहेत हे समजत नाही

दरम्यान, राष्ट्रवादी ही शरद पवारांची आहे, असं विधान करणाऱ्या मंत्री चंद्रकांतदादा पाटलांवरही त्यांनी जोरदार टीका केलीये. चंद्रकांत दादांची 'स्लीप ऑफ टंग' झाली असावी. मात्र, ते महाविकास आघाडीचे आहेत की महायुतीचे आहेत, हे समजत नसल्याचं ते म्हणालेत.‌ विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची याचा कौल दिल्याचंही ते म्हणालेत. वाढत्या वयामुळे चंद्रकांत दादांकडून अशी वक्तव्य होत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी चंद्रकांत पाटलांना लगावला.  

Continues below advertisement

मतदारयादीतील घोळ आणि मतचोरी विरोधात विरोधकांचा मोर्चा

मतदारयादीतील घोळ आणि मतचोरी विरोधात आज (1 नोव्हेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्रित रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, किसान सभेचे नेते अजित नवले उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक संघटनांचे पदाधिकारी देखील या मोर्चात सहभागी झाले होते. सर्व विरोधी पक्षांनी मिळून आज सत्याचा मोर्चा काढला आहे. यावरुन सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी टीका केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

MVA ans MNS Mumbai Morcha: आमची सत्ता रस्त्यावर! राज अन् उद्धव ठाकरेंची बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावत 'मनसे' एकीची वज्रमूठ; निवडणूक आयोगाला गर्भित इशारा