बीड : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या घोषणेची बीडमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे. बीडमधील परळी आणि केजमध्ये राष्ट्रवादीचा आमदार निवडून येत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यात आल्यावर फेटा बांधणार नाही, असा निर्धार अमोल कोल्हे यांनी केला आहे. शिवस्वराज्य यात्रा ही परळीहून अंबाजोगाईला आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राज्यभर सध्या फिरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा निघाली आहे. शिवस्वराज्य यात्रा ही परळीहून अंबाजोगाईला आली, त्यावेळी नमिता मुंदडा यांनी अमोल कोल्हे यांना फेटा बांधायला घेतला. मात्र अमोल कोल्हे यांनी फेटा बांधण्यास नकार दिला.
केज विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या आमदार नमिता मुंदडा आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे होणार नाही, तोपर्यंत बीडमध्ये फेटा बांधणार नाही, असा निश्चय कोल्हे यांनी बोलून दाखवला.
केज विधानसभा मतदारसंघ आणि परळी मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत. परळीमधून महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे सध्या आमदार आहेत, तर केजमधून संगीता ठोंबरे आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांचा पराभव केला होता, तर संगीता ठोंबरे यांनी राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा यांचा पराभव केला होता. त्यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या या दोन्ही जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली आहे.