अहमदनगर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले उपोषण (hunger strike) राष्ट्रवादीचे (NCP) आमदार निलेश लंके (Nilesh lanke) यांनी मागे घेतले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या आश्नासनानंतर लंके यांनी आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत लिंबू पाणी घेत लंके यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे घोषित केले. नितीन गडकरी यांनी दूरध्वनी द्वारे लंके यांच्यासोबत संपर्क साधला आणि रस्ते दुरुस्तीबाबत आश्वासन दिले. 


अहमदनगर जिल्ह्यातील अनेक महामार्गांच्या झालेल्या दुरवस्थेवरून आमदार निलेश लंके गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, आ. प्राजक्त तनपुरे आणि आ. रोहित पवार यांनी लंके यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील लंके यांची भेट घेतली होती. आज अजित पवार यांनी मध्यस्थी करत निलेश लंके यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन लंके यांनी आपले उपोषण मागे घेतले. लंके यांनी उपोषण मागे घेतल्याने अजित पवार यांच्या मध्यस्थीला यश आलं आहे. 


निलेश लंके यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर नितीन गडकरी यांनी काम पूर्ण करण्याचा शब्द दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. "वेळेत काम पूर्ण केलं जाईल असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिली. निलेश आणि मी पाठपुरावा करणार ओहोत. कोरोना काळात देखील जीव धोक्यात घालून निलेश लंके यांनी मोठं काम केलंय, असे कौतुक अजित पवार यांनी केलंय. 


अजित पवार यांनी यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. "सरकार आल्यापासून अनेक जण वाचाळवीर झाले आहेत. राज्यपालांपासून सगळे सत्ताधारी काहीही बोलतात. महाराष्ट्राचे मंत्री काम करण्यासाठी झाले की अशी वक्तव्य करण्यासाठी? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी आमदार प्रसाद लाड, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेकांवर टीका केली. याबरोबरच या सर्वांना येत्या 17 तारखेच्या मोर्चात उत्तर देऊ असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 


कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई गेल्या काही दिवसांपासून सतत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांच्यावर देखील यावेळी अजित पवार यांनी हल्लाबोल केला. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्रीच अशी वक्तव्य करणार असेल तर प्रश्न सोडवणार कोण? ज्या कर्नाटकात आपल्यावर अन्याय होतो त्याच कर्नाटक बँकेला मदत देण्याचे काम या सरकारने केले. अरे ला कारे करण्याची गरज असताना ही कामाची पद्धत कोणती? असा प्रश्न यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला.