कोल्हापूर : अॅम्ब्युलन्स ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने कोल्हापुरात एका चिमुकल्याला आपला जीव गमावावा लागला आहे. कार्तिक कारगदे असं या चिमुकल्याचं नाव आहे. कोल्हापुरातील ट्रॅफिकमध्ये अॅम्ब्युलन्सचा सायरन वाजत होता आणि लोकांच्या संवेदनशीलतेची परीक्षाही होत होती.


गडहिंग्लजच्या कार्तिकला पोटात दुखू लागल्यानं त्याचे बाबा त्याला पुण्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन चालले होते. मात्र वाटेतच त्याची प्रकृती बिघडली आणि कुटुंबियांनी अॅम्ब्युलन्स कोल्हापूरकडे वळवली.

कोल्हापुरात येताच त्यांची गाठ पडली ती ट्रॅफिकशी. कार्तिकचे वडील जीवाच्या आकांताने लोकांना विनवण्या करत होते. अॅम्ब्युलन्सला वाट करुन देण्यासाठी हातापाया पडत होते. मात्र त्यांना कुणीही वाट मोकळी करुन दिली नाही.

आपल्या कुशीतच पोरानं जीव सोडल्याचं दुःख पचवणं अवघड होतं. पण करिअप्पा यांनी त्यातून बाहेर पडत एक फेसबुक पोस्ट लिहिली. त्यात अॅम्ब्युलन्सला वाट देण्याचं आवाहन केलं.

त्यानंतर एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी कोल्हापुरातल्या रस्त्यांवर अॅम्ब्युलन्स घेऊन फेरफटका मारला. पण एकानेही सायरनचा आवाज ऐकून वाट देण्याचं औदार्य दाखवलं नाही.

तेव्हा मित्रांनो... हा आवाज लक्षात ठेवा... आणि ऐकू आला... तर वाट द्या... कुणाचा तरी जीव वाचेल...