मुंबई : नुकतंच पार पडलेल्या अधिवेशनात ठाकरे आणि शिंदे गटातला टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. फोटोसेशनमध्ये उद्धव ठाकरेंच्या एन्ट्रीमुळे वैतागलेले एकनाथ शिंदे पाहायला मिळाले. एकीकडे असं असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंचे शिलेदार अंबादास दानवे यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात एक मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना फुटली याची खंत असून दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अशी आपली इच्छा असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं.
शिवसेना म्हणून आपण एकत्र असलं पाहिजे, शिवसेनेची एकत्रित ताकद राज्याला दिसली पाहिजे असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं. एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्रित याव्यात अशी अपेक्षा अंबादास दानवे यांनी केली.
Ambadas Danve On Majha Katta : आमची संघटना कुणीतरी फोडली याची सल
दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात का असा प्रश्न अंबादास दानवे यांना विचारला. त्यावर दानवे म्हणाले की, शिवसेना फुटली त्यावेळी मनाला वेदना झाल्या. आम्ही काही सत्तेसाठी जन्मलो नाही. आमची संघटना फुटली. मनाला झालेली ही वेदना कधी ना कधी भरुन यावी ही अपेक्षा आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, "आमची एवढी मजबूत संघटना फुटली, ती कुणीतरी फोडली याची मनाला कायम सल राहिली. आता शिवसेना म्हणून एकत्रित ताकद राज्याला दिसली पाहिजे. तशी आशा ठेवायला काय हरकत आहे?"
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांचे हे शेवटचे अधिवेशन होते. विरोधी पक्षनेते म्हणून ऑगस्टपर्यंत त्यांचा कार्यकाल आहे. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणं पसंत केलं होतं. आता शिवसेनेच्या फुटीवर त्यांनी खंत व्यक्त केली. त्याचवेळी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
अंबादास दानवे यांच्या कामाचे कौतुक
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांनी उल्लेखनीय काम केलं अशी स्तुती सत्ताधारी तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसले तरी त्यांनी कधीही भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला. अंबादास दानवे यांनी पुन्हा यावं, पण याच पक्षातून यावं असंही उद्धव ठाकरे म्हणाले.