Walmik Karad : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर तब्बल सत्तावीस दिवसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे या दोन आरोपींना पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलं. त्यांना पकडण्यात आल्यानंतर त्यांना सीआयडीच्या स्वाधीन करण्यात आलं असून पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार खंडणीखोर वाल्मिक कराड असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. महाराष्ट्रामध्ये वाल्मीक कराडच्या कृष्णकृत्यांविरोधात रोष व्यक्त केला जात आहे आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जनआक्रोश मोर्चातून होत आहे. बीडमधील आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडच्या गुन्हेगारी गुन्हेगारी कृत्यांचा उलघडाच केला आहे. 


वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुलेवर 19 गुन्हे दाखल 


संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील सर्वच गुन्हेगार अट्टल असून मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुद्धा वाल्मिक कराडच्या पुढचा असल्याचे दिसून येत आहे. खंडणी, हाफ मर्डर, असेच गुन्हे या प्रकरणातील सर्व आरोपींवर दाखल होत आहेत. मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेला खंडणीखोर वाल्मिक कराडवर 19 गुन्हे दाखल आहेत. सुदर्शन घुलेवर तब्बल 19 गुन्ह्यांची नोंद आहे. कृष्णा आंधळेवर सहा गुन्ह्यांची नोंद आहे, महेश केदारवर सहा गुन्ह्यांची नोंद आहे. प्रतीक घुलेवर पाच गुन्ह्यांची नोंद आहे. जयरामम चाटेवर तीन गुन्ह्यांची नोंद आहे, विष्णू चाटे आणि सुधीर सांगळेवर दोन गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे इतके गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई होणार का? असा प्रश्न आहे. 


देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी तसेच एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. दरम्यान, संतोष देशमुख प्रकरणात हत्येदिवशी लोकेशन देणारे सिद्धार्थ सोनवणेला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या तिघांना फरार होण्यामध्ये धारूर जिल्ह्यातील डॉक्टर आणि ऊसतोड मजुरांचा मुकादम संभाजी वायबसे आणि त्याच्या वकील बायकोने मदत केली होती. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. वकील बायको सीआयडीच्या ताब्यामध्ये आहे. या दोघांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांना फरार आरोपींचा शोध घेण्यामध्ये मदत झाली होती. संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती.  या प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, महेश केदार यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. दुसऱ्या दिवशी विष्णू साठेवर गुन्हा नोंद झाला होता. 


तीन महिन्यांसाठी 9 लाख 72 हजार मोजले 


दरम्यान, खंडणीखोर वाल्मिक कराडवर खंडणी, हाफ मर्डर असे गंभीर गुन्हे असूनही दोन पोलिस त्याच्या दिमतीला होते. यासाठी त्याने तीन महिन्यांसाठी 9 लाख 72 हजार रुपये मोजले होते. त्यामुळे खाकी साक्षीने त्याचा गोरखधंदा सुरु होता का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. बीडमधील आरोपी मोकाट सुटल्याने बीड पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच इतका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला दोन दोन पोलिस दिमतीला मिळतात तरी कसे? असा प्रश्न आहे. इतके नव्हे, तर त्याला शस्त्र परवाना सुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळे खिराफत वाटल्याप्रमाणे परवाना देण्याचा धंदा बीड पोलिसांना केला होता का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या