अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात 91 वं साहित्य संमेलन हे बडोद्यातील चौथे संमेलन असेल. यापूर्वी 1901 साली सातवे संमेलन, 1921 साली अकरावे संमेलन आणि 1934 साली विसावे संमेलन बडोद्यात आयोजित करण्यात आले होते.
बडोद्यातील यापूर्वीची संमलेन आणि अध्यक्ष :
- 1901 (सातवं संमेलन) : संमेलनाध्यक्ष – का. र. कीर्तीकर
- 1921 (अकरावं संमेलन) : संमेलनाध्यक्ष – न. चिं. केळकर
- 1934 (विसावं संमेलन) : संमेलनाध्यक्ष – ना. गो. चापेकर
याआधी तीन साहित्य संमेलनं बडोद्यात आयोजित झाली असली, तरी 91 साहित्य संमेलन हे विशेष ठरेल. कारण स्वातंत्र्योत्तर काळात बडोद्यात आयोजित होणारं हे पहिलं साहित्य संमेलन ठरणार आहे.
विवेकानंद आश्रमाने विदर्भ साहित्य मंडळाला आपल्या आश्रमात साहित्य संमेलन आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार 91 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकरमधील हिवरा आश्रमात होणार होतं. मात्र त्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी प्रस्ताव मागे घेतला.
बुलडाण्यातील हिवरा आश्रमावरुन वाद
बुलडाण्याच्या हिवरा आश्रमात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला होता. हिवरा आश्रम हा वादग्रस्त शुकदास महाराजांचा असल्याने, त्या ठिकाणी संमेलन घेऊ नये, अशी मागणी अंनिसनं केली होती.
अंनिसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांनी हा आक्षेप घेतला होता. अंनिसच्या श्याम मानव यांनी शुकदास महाराजांचा भांडाफोड केल्याचा दाखलाही फेसबुकवर दिला होता. वाद निर्माण झाल्याने आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी प्रस्ताव मागे घेतला होता.