कोल्हापूर : उच्चभ्रू वस्तीत मंडप घालून दारु विक्री होत असल्याचा प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे. दारुविक्रीच्या प्रकाराची माहिती मिळताच शाहुपुरी पोलिसांनी छापा घालून दुकानदारावर कारवाई केली.
महामार्गावर दारुविक्रीला बंदी घातल्यानं स्कॉच हाऊस नावाच्या दुकानमालकाने थेट भर वस्तीतच मंडप घालून दारु विक्री सुरु केली. दारुविक्रीच्या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी छापा घातला आणि दारुच्या 1 हजार बाटल्या जप्त केल्या.
मंडपामध्ये भल्या मोठ्या भांड्यात सुमारे 700 हून अधिक बियर आणि 300 हून अधिक विदेशी मद्याच्या अशा एकूण एक हजारापेक्षा जास्त बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
कारवाई दरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करुन कारवाई पूर्ण केली. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असुन त्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.