Akola: 'सिबिल' खराब असल्यामुळे अनेकांचं घराचं स्वप्नं तुटल्याचं तुम्ही अनेकांनी पाहिलं आणि ऐकलं असेल. मात्र, 'सिबिल'मुळे लग्न तुटल्याची एक बातमी सध्या समाज माध्यमांवर अक्षरशः धुमाकूळ घालतेय.अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरमध्ये हा प्रकार घडल्याचं समोर आलंय. नेमकं काय आहे हे प्रकरण? खरंच 'सिबिल'मुळे एका तरुणाचं लग्न तुटलं आहे का? पाहूयात, 'एबीपी माझा'चा रियालिटी चेक. (Akola)
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरच्या एका बातमीचा सध्या सर्वच प्रकारच्या सोशल माध्यमांवर धुमाकूळ सुरू आहेय. ही बातमी आहे 'सिबिल'मुळे लग्न तुटल्याची खरंच ही बातमी सत्य आहे का? नेमकं काय घडलं मुर्तीजापुरमध्ये? याचा आढावा 'माझा'ने घेतला. यात मुर्तिजापूरमध्ये एक नव्हे तर दोन तरुणांचा विवाह 'सिबील' कमी असल्याने मोडल्याचं समोर आलंय. मात्र, दोन्ही कुटूंब समोर यायला तयार नाहीये. स्थानिकांनी सिबिल खराब असल्यानं लग्न तुटल्याची घटना खरी असल्याचं सांगितलंय. (Cibil Score)
"हो, घटना खरी आहे!" स्थानिकांचा दावा
‘ABP माझा’ने स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञांशी तसेच दोन्ही तरुणांच्या घरच्यांशी याप्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी संवाद साधला. यावेळी वकील राधिका काळे यांनी अशा घटनांचा उल्लेख केला. तसेच, नागरिक विष्णू लोडम आणि माधव पाटील यांनीही ही घटना खरी असल्याचे सांगितले.मात्र, समाजात बदनामी होईल, या भीतीने दोन्ही तरुणांच्या कुटुंबियांनी माध्यमांसमोर काहीही बोलायला नकार दिलाय. मात्र, मूर्तीजापुरकर ही घटना झाल्याचं सत्य असल्याचं सांगतायेत.
विवाह इच्छुक तरुणांसाठी धोक्याची घंटा?
मुर्तीजापुरची घटना ही विवाह इच्छुक तरुणांसाठी धोक्याची घंटा असल्याचे समाजात काम करणाऱ्या लोकांना वाटतंय. आतापर्यंत घराच्या किंवा गाडीच्या कर्जासाठी 'सिबिल' महत्त्वाचा मानला जायचा. मात्र, आता विवाह जुळवतानासुद्धा ‘सिबिल स्कोअर’ तपासला जातोय का? हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. विवाह जुळवताना आता "घर आहे का?", "नोकरी आहे का?" यासोबत "सिबिल स्कोअर चांगला आहे का?" हेही पाहिले जात असल्याचे दिसते. त्यामुळे “लग्न करायचं असेल तर आधी सिबिल सुधरवा” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे!
सध्या अनेक सामाजिक समस्यांमुळे अनेक तरुणांची लग्न होत नाहीयेत. घराच्या स्वप्नाच्या मार्गात अडसर बनत प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलेला 'सिबिल' आता विवाह इच्छुक तरुणांच्याही मानगुटीवर बसतो की काय?, अशी परिस्थिती यामुळे निर्माण झालीये. त्यामुळे "लग्न करायचं असेल तर सिबिल सुधरव", असं म्हणण्याची वेळ आता आलीये.
हेही पहा:
हेही वाचा: