अकोला : गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडील विठ्ठल पाटील यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांना अखेर मुहूर्त सापडला आहे. पाच दिवसांनंतर मूर्तीजापूर पोलिसांनी कारवाईच्या दिशेने पहिलं पाऊल उचललं आहे.


माजी आमदार विठ्ठल पाटील यांनी मारहाण केल्याचा प्राचार्य संजय आठवले आणि शिपाई अमोल काळे यांनी आरोप केला होता. या दोघांनाही मूर्तीजापूर पोलिसांनी आज दुपारी चार वाज्याल्यानंतर चौकशीसाठी पाचारण केले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी अद्याप घटनास्थळाचा पंचनामाही केला नाही.

पाच दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडील आणि माजी आमदार विठ्ठल पाटील यांनी मूर्तिजापूर इथल्या देशमुख कॉलेजातील कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. तसेच अश्लिल भाषेत शिवीगाळही केली.

स्वत: गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप करणार नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे विठ्ठल पाटील यांच्यावर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, या घटनेला आता पाच दिवस उलटल्यानंतरही विठ्ठल पाटलांवर साधा गुन्हाही दाखल झाला नाही. त्यामुळे फडणवीस सरकार रणजित पाटलांच्या वडिलांना पाठीशी घालत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.