Akola News Update : अकोल्यात स्वयंरोजगाराच्या (self employment fraud in Akola) नावाखाली तब्बल अडीच हजारांवर महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे येथील राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन या बोगस कंपनीच्या नावाखाली हा गोरखधंदा सुरू होता. पुणे येथील अजित महादेव हिरवे या कंपनीचा मालक आहे. यात पैसे घेऊनही अनेक महिलांना मशिन दिल्याच गेल्या नाहीत. तर ज्यांना मशिन दिल्या गेल्या त्यांना महिनाभरानंतर कच्चा माल पुरवणं बंद करण्यात आलं. या फसवणूक घोटाळ्याची व्याप्ती राज्यातील अनेक जिल्ह्यांसह थेट मुंबईपर्यंत पोहोचली आहे. 


राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन या अस्तित्वात नसलेल्या बोगस कंपनीनं अकोल्यासह राज्यभरातील महिलांची मोठी फसवणूक केली. महिलांना बटन बनविण्याची मशिन देत त्यांच्याकडून प्रत्येकी 11 हजार रूपये जमा करण्यात आले.  यासोबतच मसाला बनविण्याची मशिन घेणाऱ्या महिलांकडून प्रत्येकी 15 हजार रूपये घेतल्या गेलेत. 


अकोल्यात या कंपनीची एजन्सी राष्ट्रवादी महिला ओबीसी सेलच्या जिल्हा महासचिव संगिता चव्हाण यांनी घेतली होती. त्यांच्या माध्यमातून कंपनीशी जुळलेल्या अडीच हजारांवर महिलांचे जवळपास पावणेतीन कोटी लुटले असल्याचा आरोप आहे. 


मिटकरीकडून पदाधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न तर पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले कारवाईचे निर्देश


यासंदर्भात नुकतीच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांचा मोर्चा काढत पालकमंत्री बच्चू कडूंकडे धाव घेतली. यावेळी यात आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी संगिता चव्हाण यांना वाचविण्याचा प्रयत्न आमदार अमोल मिटकरी हे आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी केला आहे. तर पालकमंत्री बच्चू कडू यांनी यात ठोस कारवाईचे निर्देश दिले आहेत. तर यासंदर्भात आमदार अमोल मिटकरींनी काहीही प्रतिक्रिया देणार नसल्याचं म्हटलं आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha