अकोला : 'एबीपी माझा'च्या बातमीच्या दणक्याने 221 शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या विम्याचे 81 लाख मिळाले आहेत. पीक विमा थकीत असल्याने अकोल्यात शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबर रोजी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना साडेतीन तास कार्यालयातच कोंडून ठेवले होते. ही बातमी एबीपी माझाने राज्यासमोर मांडली. त्यानंतर आता या शेतकऱ्यांना त्यांचे विम्याचे पैसे मिळाले आहेत.
अकोल्यातील गोरक्षण मार्गावरल्या 'न्यु इंडिया इन्श्युरंस कंपनी'च्या कार्यालयात हा प्रकार घडला होता. अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातल्या पणज, रुईखेड आणि बोचरा या गावांमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पीकविम्याचे पैसे मिळत नव्हते. त्यामुळे 37 शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना तब्बल साडेतीन तास कोंडून ठेवलं होतं.
तीन गावांमधील 221 केळी उत्पादक शेतकऱ्यांचे 81 लाख रूपये 'न्यु इंडिया इन्श्युरंस कंपनी'कडे गेल्या दिड वर्षापासून थकीत होते. त्यांनी अनेकदा विम्याची रक्कम मिळवण्यासाठी या कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले होते. मात्र, येथील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यायला वारंवार टाळाटाळ केली. अखेर या संतप्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोंडून ठेवत आंदोलन केले.
त्यानंतर विमा कंपनीने या शेतकऱ्यांच्या विम्याचे थकीत पैसे 21 नोव्हेंबरपर्यंत विनाविलंब देण्याचे लेखी आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. या शेतकर्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेनेही पाठिंबा दिला होता. अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे हे आंदोलन आणि त्यांच्यावरील अन्यायाला सर्वप्रथम 'एबीपी माझा'ने वाचा फोडली. अखेर 'माझा'च्या दणक्यानंतर गेल्या दिड वर्षांपासून विमा कंपनीकडे थकीत असेलेले 81 लाख रुपये आज या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोंडून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याचे 81 लाख मिळाले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Nov 2019 09:02 PM (IST)
पीक विमा थकीत असल्याने अकोल्यात शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबर रोजी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना साडेतीन तास कार्यालयातच कोंडून ठेवले होते. ही बातमी एबीपी माझाने राज्यासमोर मांडली. त्यानंतर आता या शेतकऱ्यांना त्यांचे विम्याचे पैसे मिळाले आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -