अकोला : ऑनलाईन सातबाराच्या जनजगृतीसाठी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क सायकलवारी केली. महसूल दिनाचं औचित्य साधून अकोल्यात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.

शेतकऱ्यांमध्ये ऑनलाईन सातबारासंदर्भात जागृती करण्याचे सरकारने प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यात आज महसूल दिवस असल्याने, हेच निमित्त साधत अकोल्याचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी खडकी आणि चांदूर गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.



विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सायकल आणि बैलगाडीवरुन प्रवास केला. सायकल चालवताना कुणी सर्वसामान्य तरुण वगैरे असावा असे लोकांना वाटले. मात्र, हा तरुण दुसरा-तिसरा कुणी नव्हता, तर ते होते अकोल्याचे जिल्हाधिकारी.

जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी शासकीय निवासस्थानापासून सहकाऱ्यांसोबत सायकलने खडकी गाव गाठलं. खडकीहून पुढे चांदूरकडे ते बैलगाडीने गेले.



विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा प्रसार करण्यासाठी दर सोमवारी सायकलनेच कार्यालयात जाण्याचा निश्चय जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी केला आहे. यावेळी गेल्या वर्षी चांदूरमध्ये लागवड केलेल्या झाडांचा पहिला वाढदिवसही साजरा करण्यात आला.