अकोला : मतदान संपल्यानंतरही अकोल्यात भाजपातील भांडणं थांबलेली नाहीत. काल संध्याकाळी भाजपने अकोला महापालिकेतील पक्षाचे नगरसेवक आशिष पवित्रकार यांना पक्षविरोधी कारवायांसाठी निलंबित केले आहे. यासोबतच पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय लहानेंचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.


हकालपट्टी करण्यात आलेले दोन्ही पदाधिकारी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे समर्थक आहेत. अकोला जिल्हा भाजपात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे दोन गट आहेत. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडत नाहीत. राज्यात भाजपमध्ये गडकरी-फडणवीस यांच्यातल्या सुप्त संघर्षाचे पडसाद अकोला भाजपातही पहायला मिळत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे हे गडकरींचे कट्टर समर्थक आहेत. तर गृहराज्यमंत्री रणजीत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत.

'पार्टी विथ डिफरन्स'चा दावा करणारा भाजप अकोल्यात 'पार्टी विथ डिफरन्सेस' झाली आहे. जिल्हा भाजप केंद्रीय राज्यमंत्री, स्थानिक खासदार संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या गटात दुभंगली आहे. गेल्या पाच वर्षांपासून दोन्ही गट एकमेकांना नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भाजप पक्षसंघटना, महापालिका आणि अकोट, मुर्तिजापूर आणि तेल्हारा नगरपालिका धोत्रे गटाच्या ताब्यात आहेत. मात्र, अनेक जिल्हा शासकीय समित्यांवर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या समर्थकांचं वर्चस्व आहे.

धोत्रे केंद्रात राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी रणजीत पाटलांचं जिल्ह्यातलं प्रशासकीय वलय कमी करण्यात यश मिळवलं आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपचे चारही उमेदवार धोत्रे समर्थक आहेत. मुर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळेंना आपल्या गटात आणत धोत्रेंनी रणजीत पाटील यांचा एकमेव समर्थक आमदार फोडला. याच हरीश पिंपळेंनी धोत्रेंच्या उपस्थितीत विधानसभेच्या एका सभेत रणजीत पाटील यांच्यावर कमरेखालची टिका केली होती. यामुळे पाटील समर्थकांनी मुर्तिजापूर मतदारसंघात पिंपळेंच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती. यामध्ये अकोला महापालिकेतील नगरसेवक आशिष पवित्रकार आणि जिल्हा परिषद सदस्य अक्षय लहाने यांचा सहभाग असल्याची लेखी तक्रार हरीश पिंपळेंनी पक्षाकडे केली होती.

पिंपळेंच्या तक्रारीवरून काल मतदान संपल्यावर लगेच आशिष पवित्रकार आणि अक्षय लहानेंची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टी करण्यात आलेले नगरसेवक आशिष पवित्रकार हे डॉ. रणजीत पाटील यांचे चुलतभाऊ आहेत. तर जिल्हा परिषद सदस्य अक्षय लहाने हे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिवही आहेत. अक्षय लहाने हे जनसंघाचे दिवंगत माजी प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार भाऊसाहेब लहाने यांचे नातू आहेत.

विधानसभा निवडणुकीत धोत्रे गटाने पालकमंत्री रणजीत पाटील यांना पक्षाचे बॅनर, होर्डिंग्जसह प्रचारातूनही पूर्णपणे बेदखल केलं होतं. त्यामूळे विधानसभेच्या निकालाआधीच अकोला भाजपमधील पेटलेला हा संघर्ष पुढच्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.