Ajit Pawar Pune :  पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडच्या (PCMC) वाढत्या लोकसंख्येला योग्य सुविधा पुरवा आणि वाहतूक, पाणीप्रश्न, उद्योग, गृहसंस्थांच्या समस्या तात्काळ सोडवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar in Nagpur) यांनी केली होती. नागपूरातील अधिवेशनात बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. पुणे आणि  पिंपरी-चिंचवड शहरांच्या (Pune Pimpari chinchwad news) विकासासाठी सर्वपक्षीयांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. 


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. गृहनिर्माण सोसायट्यातील रहिवाश्यांचेही अनेक प्रश्न आहेत. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरातील सोयीसुविधांमध्ये वाढ होण्याची गरज आहे. हिंजवडीसारख्या परिसरातील उद्योग राज्याबाहेर हैदराबादकडे स्थलांतरीत होत आहेत. युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे या सगळ्या महत्वाच्या आपण विचार करायला हवा, असंही ते म्हणाले.


पुणे आणि पिंपरी-चिंचवड महत्वाची शहरे असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली पाहिजे. पुण्याच्या महत्वाच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली पाहिजे. त्या प्रश्नांवर आणि समस्यांवर तोडगा काढला पाहिजे, असंही ते म्हणाले. 


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या प्रश्नांसंदर्भात विधानसभेत चर्चा


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या प्रश्नांसंदर्भात विधानसभेत उपस्थित चर्चेत सहभाग घेताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड राज्यातील महत्वाची शहरं असून तिथल्या वाहतूक, पिण्याचे पाणी, कायदा-सुव्यवस्था, उद्योगपुरक वातावरण आदी प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यांची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक आयोजित करा, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे. 


राजकारण बाजूला ठेवा अन् एकत्र या...


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित यावे. शहरांच्या  विकासासाठी  विरोधी पक्ष राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य करतील, असा विश्वासही अजित पवार यांनी दिला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीशी सहमती दर्शवत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.


कोयता गॅंगवर कारवाई करा...


यापूर्वी पुण्याच्या गुन्हेगारीवरदेखील अजित पवारांनी भाष्य केलं होतं. पुण्यात सध्या धुमाकूल घातल असलेली कोयता गॅंगवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले, सध्या कोयता गॅंग पुण्यातील अनेक भागात दहशत निर्माण करत आहे. त्यामुळे अनेक पुणेकरांना त्रास  होत आहे. त्यामुळे या गॅंगवर मोक्का कारवाई करा किंवा त्यांना जिल्ह्यातून तडीपार करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.