इंदापूर : ‘शरद पवार हेच आमचे दैवत असून ते सांगतील ती पूर्वदिशा’,असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (बुधवार) केलं. बारामतीच्या शरयू फाऊंडेशनच्या वतीने अनंतराव पवार सामाजिक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.


पवार कुटुंबाकडून वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवले जातात. इंदापूर तालुक्यात शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून मोठं काम उभं राहिलं असून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना या फाऊंडेशनमार्फत मोफत विहिरी खोदून देण्यात आल्या आहेत.

शरयू फाऊंडेशनचा कारभार अजित पवार यांच्या भावजय शर्मिला पवार या पाहतात. याचबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘या कामांच्या जोरावर त्या इंदापूरची आमदारकी मागणार नाहीत. त्यामुळं इंदापूरच्या आमदारांनी काळजी करू नये. शरद पवार हेच आमचे दैवत असून ते सांगतील ती पूर्वदिशा.’

सोबतंच अजित पवार यांनी त्यांच्या आयुष्यातील जुन्या आठवणींनाही उजाळाही दिला. ‘सध्या आपण राजकारणात कितीही उंचीवर पोहोचलो असलो तरीही वडिलांच्या निधनानंतर घरामध्ये साधा ट्रॅक्टरही नसल्याने शेती पडीक ठेवावी लागली होती.’ अशी आठवण त्यांनी सांगितली.