गांडुळाची उपमा शिवसेनेला झोंबल्याने पोटातलं बाहेर : अजित पवार
एबीपी माझा वेब टीम | 05 Apr 2018 12:15 PM (IST)
शिवसेनेला दिलेली गांडुळाची उपमा इतकी झोंबली, की त्यांच्या पोटातील सगळं बाहेर पडलं, असं अजित पवार म्हणाले
सांगली : शिवसेनेला मी दिलेली गांडुळाची उपमा त्यांना इतकी लागली, की त्यांच्या पोटातील सगळं बाहेर पडलं, या शब्दात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी 'सामना'तून झालेल्या टीकेवर उत्तर दिलं. शिवसेनेला दिलेली गांडुळाची उपमा इतकी झोंबली, की त्यांच्या पोटातील सगळं बाहेर पडलं. आता त्यांचं खरं, की माझं, याचा निर्णय जनताच घेईल, असंही अजित पवार म्हणाले. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी आणि अजित पवार यांनी शिवसेनेचं खरं स्वरुप उघड केल्यामुळे शिवसेनेचा तीळपापड झाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे सरकारला नालायक म्हणतात, पण याच सरकारमध्ये शिवसेनेचे 12 मंत्री आहेत, हाच शिवसेनेचा दुटप्पीपणा आहे, असंही तटकरे म्हणाले. अजित पवार यांनी शिवसेनेची तुलना गांडुळाशी केल्यानंतर शिवसेनेने ‘सामना’तून त्यांच्यावर पलटवार केला. शरद पवारांनी जे कमावले ते अजित पवारांनी अल्पावधीतच गमावले. त्यामुळेच 75 व्या वर्षातसुद्धा पक्षबांधणीसाठी पवारांना वणवण करावी लागत असल्याची टीका, सामनातून करण्यात आली आहे. आम्हाला गांडूळ म्हणणाऱ्यांना दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल. म्हणून तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असंच म्हणावं लागेल, असा हल्ला शिवसेनेने चढवला आहे.