मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या वक्तव्यासंदर्भात आता अजित पवारांनी मोठं विधान केलं आहे. आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांना सांगितलं. सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत अजित पवारांनी यावर भाष्य केलं.

Continues below advertisement


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला रामराम करण्याची हालचाल सुरू असतील. म्हणूनच शरद पवारांकडून पक्ष एकत्रीकरणाबाबतचे सूतोवाच केले असतील असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या आमदारांना सांगितलं.  


राष्ट्रवादीतील दोन्ही गट हे एकत्र यावेत अशी अनेक आमदारांची इच्छा आहे. त्याबाबतचा निर्णय पक्षातील तरुण नेतृत्वाने घ्यावा असं वक्तव्य शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावर अजित पवारांनी भाष्य केलं. शरद पवारांच्या पक्षातील गळती थांबवण्यासाठीच ते वक्तव्य केलं गेलं असेल अशी शक्यता अजित पवारांनी व्यक्त केली. 


 






Sharad Pawar Ajit Pawar : शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर


राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांमधल्या बंद दाराआड झालेल्या चर्चांच्या बातम्या अनेकवेळा बाहेर आल्या. पण सोमवारी एका कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांशी अगदी जाहीर व्यासपीठावर मनमोकळा संवाद साधताना दिसले. निमित्त होतं सहकार क्षेत्राशी संबंधित मुंबईतील एका कार्यक्रमाचं. 


दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार हेच निर्णय घेऊ शकतील अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी अलीकडेच अनौपचारिक गप्पांदरम्यान दिली होती. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार पहिल्यांदाच एका व्यासपीठावर दिसले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महायुतीचे बॉस म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. 


Maharashtra NCP News : एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया आणि अजितने घ्यावा


इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, "संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही? हा निर्णय सुप्रियानं घ्यावा. पक्षात दोन प्रवाह आहेत, एकाला वाटते अजितसोबत जावे. दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावे या मताचा आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं." 


शरद पवार म्हणाले की, "एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजितने बसून ठरवावं. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेलं सगळे एकत्र होते त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकचं आहे. त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझे सगळे खासदार एक मताचे आहेत, आमदारामध्ये अस्वस्थता असू शकते. मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे. पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं."