मुंबई: पहलगाममधील दहशतवादी (Terrorist) हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तर जम्मू काश्मीरसह उत्तर भारतातील आपलं नियोजित पर्यटन देखील अनेकांनी रद्द केलं. त्यातच, भारत आणि पाकिस्तान सीमारेषेवर तणाव निर्माण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत भारतीय लष्करप्रमुखांच्या बैठका वाढल्याने कुछ तो बडा होने वाला है... असा मेसेज सर्वत्र गेला. तर, 7 मे रोजी भारतीय वायूसेनेनं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशवाद्यांचे 9 अड्डे नेस्तनाबूत केले. त्यानंतर, बॉर्डवरवर गोळीबार आणि दोन्ही देशांच्या सैन्यदलाच्या कारवाया सुरू झाल्या. त्यामध्ये, मुंबईच्या (Mumbai) घाटकोपर येथील मुरली नाईक यांना वीरमरण आलं. शत्रुशी लढताना ते शहीद झाले. मजूर बापाचा मुलगा देशासाठी शहीद (Martyr) झाल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. या वृत्ताची दखल घेत मुंबईतील एका जोडप्याने आपलं उन्हाळी व्हॅकेशन रद्द करत पिकनिक ट्रीपची रक्कम शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांना देऊ केली आहे.
मुंबईतील एका जोडप्याने गेल्या काही वर्षांपासून नियोजन करत आपल्या फॉरेन ट्रीपची तयारी केली होती. मात्र, भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय सैन्यातील जवानांच्या शौर्याला सलाम करत मुंबईतील या जोडप्याने अभिमानास्पद कृती केलीय. आपली विदेशी ट्रीप रद्द करत, ट्रीपसाठीची संपूर्ण रक्कम घाटकोपर येथील शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांना देऊ केली. एका इन्स्टाग्राम पेजवरुन या जोडप्याचा फोटो आणि संबधित घटनेची माहिती शेअर करण्यात आल्याने ते फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. देशातील जवान सीमारेषवर लढत असताना आपण सुट्टी एन्जॉय करायला जाणं योग्य नाही, असे म्हणत या कपल्सने आपली ट्रीप रद्द करत ट्रीपची संपूर्ण रक्कम 1 लाख 9 हजार 1 रुपये ही शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांसाठी देवू केली आहे.
उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना शहीद
भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत पूँछ, उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्संना भारतीय सैन्य दलाकडून चोख प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे. दरम्यान, उरी सेक्टरमध्ये मुंबईतील मजूर बापाचा लेक मुरली नाईक हे पाकिस्तान्यांशी लढताना शहीद झाले. त्यांच्या वीरमरणाचे वृत्त गावी येताच, कुटुंबीयांनी टाहो फोडला. आपला तरणाबांड लेक गमावल्यानंतर आईच्या डोळ्यातील अश्रूंनी अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. मुरली नाईक शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या आंध्र प्रदेशातील मूळ गावी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. तर, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली. मुरली नाईक हे मूळ आंध्र प्रदेशचे असले तरी त्यांचे कुटुंब हे मुंबईतील घाटकोपरच्या कामराज नगर परिसरात राहात होते. नुकतेच मुरली यांचे आई-वडिल गावच्या जत्रेसाठी आंध्र प्रदेशात गेले होते, तिथेच मुरली शहीद झाल्याचे वृत्त त्यांना समजले. या घटनेनं कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, देशासाठी आपला मुलगा शहीद झाल्याचा अभिमानही त्यांच्या वडिलांनी बोलून दाखवला.
हेही वाचा
अपघातवार... देवदर्शनाहून गावी परताना अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू; दिवसभरात अपघातात 9 ठार
