शिवसेना आणि बळीराजाचा विरोध
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बळीराजा शेतकरी संघटना आता आमने-सामने येण्याची चिन्हं आहेत. कारण कारखानदारांचे दलाल बनलेल्या राजू शेट्टींनी फक्त 3200 रुपयाचा भाव मागून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप बळीराजा आणि शिवसेनेनं केला आहे.
पहिली उचल 3500 रुपये मिळाली पाहिजे यासाठी बळीराजा संघटना आणि शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून 2 नोव्हेंबरला बळीराजा शेतकरी संघटना पुण्याच्या साखर संकुलावर जागर मोर्चा काढण्याचा तर 4 नोव्हेंबरला पुणे-बंगळुरु हायवेवर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
25 ऑक्टोबरला राजू शेट्टींनी जयसिंगपुरात ऊस परिषद घेतली होती. त्यावेळी उसाला 3200 रुपयांची पहिली उचल देण्याची मागणी त्यांनी केली होती.
बागायतदारांची व्याख्या बदला
महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांची व्याख्या बदलण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. सध्या महाराष्ट्रातील 81 टक्के शेतकऱ्यांकडे फक्त 2 एकर जमीन आहे. मग 2 एकर ऊसाचं पीक घेणारा बागायतदार कसा? असा सवाल पवारांनी केला.
इंडोनेशियात 40 दिवसांनी पाणी दिलं तरी चालेल असं ऊसाचं वाण विकसित करण्यात आलं आहे. तशा पद्धतीचं संशोधन आपल्याकडे झालं पाहिजे, असंही पवारांनी म्हटलं. ते आज उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेडकर कारखान्याचे संस्थापक अरविंद गोरे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त बोलत होते.