पुणे : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकोप्याने राहायचं ठरवलंय. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यानंतर दुसऱ्या फळीतील आम्ही देखील एकोप्याने राहतोय. पण हा एकोपा खालपर्यंत पोहोचायला वेळ लागेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात बोलत होते. जिथं राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना किंवा जिथं शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस अशी लढत झालीय तिथं एकत्र बसून प्रश्न सोडवावे लागतील.  रायगडमध्ये आम्ही मार्ग काढला. आमच्याकडून जयंत पाटील आणि मी आणि त्यांच्याकडून उद्वव ठाकरे मार्ग काढतील, असंही अजित पवार म्हणाले.  महापालिका निवडणुकीमधे प्रभाग रचना कशी असेल याबाबत आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ, असंही ते म्हणाले. 


लॉकडाऊनसंदर्भात काय म्हणाले अजित पवार 
अनलॉकच्या गोंधळाबाबत बोलताना अजित पवार (Ajit Pawar On Maharashtra Unlock) म्हणाले की, राज्याचे प्रमुख या नात्याने उद्वव ठाकरेंनी जो निर्णय लॉकडाऊनच्या बाबतीत घेतलाय तोच अंतिम आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे (Pune Pimpari Chinchwad Lockdown Unlock) निर्बंध शिथिल करण्याबाबत सोमवारी निर्णय घेणार आहोत. पुणे आणि पिंपरी चिंचवडचा पॉझिटीव्हीटी रेट पाच टक्क्यांहून कमी आहे. मात्र इतर जिल्ह्याचा जास्त आहे. त्यामुळे वेगवेगळे निर्णय घेतले जातील, असं ते म्हणाले. दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन सोमवारी पुण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की त्यांचा एक शब्द चुकला. म्हणून तर आम्ही या फंदात जास्त पडत नाही, असा टोमणा त्यांनी मारला.


वारीसंदर्भात काय म्हणाले अजित पवार 
अजित पवार वारीसंदर्भात (Ajit Pawar on Pandharpur Wari) बोलताना म्हणाले की, आज वारकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. आम्ही वारकऱ्यांना पायी पालखी सोहळा साजरा करण्यातील अडचणी सांगितल्या. मात्र वारकऱ्यांनी 50 लोकांसह पायी वारी करण्याची परवानगी मागितली आहे. मात्र एकदा पालखी निघाली की गर्दी होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आलीय, असं ते म्हणाले. 


चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंवर टीकास्त्र
यावेळी बोलताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण का नाही दिलं. पवार साहेब समोर आलं की वाकून नमस्कार करायचा आणि नंतर असं बोलायचं, असं ते म्हणाले.  चंद्रकांत पाटलांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत दादांनी सांगितलंय की ते कसे आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दल न बोललेलच बरं. मी तर सारखा झोपेतून जागा होतो आणि चॅनल लावतो. हे चॅनल ते चॅनल आणि बघतो. पडलं पडलं पडलं असं ऐकायला मिळतं असं असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला तर फडणवीसांवर बोलताना म्हणाले की,  मी उद्धव ठाकरेंना सांगणार आहे की आपण फडणवीसांची शिकवणी लावू.  मी पण त्या शिकवणीला जाईन, असं अजित पवार म्हणाले.