Ajit Pawar On Maharashtra Government : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार हे अनधिकृत आहे. या सरकारकडून मविआच्या अनेक कामांना स्थगिती देण्यात आली आहे. या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते अहमदनगरमधील तिसगाव येथे बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. 


निवडणुका तर होणारच - अजित पवार

निवडणुका म्हटल्या तर त्या बिनविरोध होण्याचा संबंध येत नाही. त्यांनी पंढरपूरची निवडणूक, कोल्हापूर, देगलूर येथील निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. एक मुंबईच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला होता. म्हणजे इतर निवडणुका होतील हे त्यांनी डोक्यातून काढून टाकावं. शेवटी लोकशाही आहे, जनतेला ज्यांना निवडून द्यायचं आहे  त्यांना निवडून देईल, असे विरोधीपक्ष नेते अजित पवार म्हणाले. 


या सरकारने मंत्रीपदाची गाजरं दाखवली -

सध्याचे सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जबाबदारी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर दिली होती. याची जाणीव शिवसेना सोडून गेलेल्यांना असायला हवी होती. ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते पुन्हा निवडून आले नाहीत. इतिहास बघितला तर फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. अनेक ठिकाणी आमदार फोडून यांनी सरकार पाडले. यांचे सरकार आले, सुरुवातीला तर हे दोघांचंच सरकार होते. आम्ही टीका करून करून विस्तार केला, यांना एक महिला मंत्री भेटली नाही. महिलांना समान हक्क हे केवळ भाषणात बोलण्यापुरतं नसावं. 40 लोकांना या सरकारने मंत्रीपदाची गाजरं दाखवली आहेत. अनेक जणांनी मंत्री पद मिळावे म्हणून नवस केले, कुणी किती नवस केले माहिती नाही. पण या सर्वांमुळे राज्याचे नुकसान होत आहे,अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेलेत. कोंबडं कितीही झाकलं तरीही सूर्य उगवायचा राहत नाही, असे अजित पवार म्हणाले. 
 
सर्व जाती धर्मांचा आदर करावा, द्वेष करू नये


आम्ही कोणाच्याही जाती-धर्माला विरोध करणारी माणसं नाहीत. ज्याने त्याने आपल्या जातीचा धर्माचा आदर केला पाहिजे. त्याबद्दल दुमत नाही, परंतु आपल्या धर्माचा आपल्या जातीचा आपण आदर करत असताना दुसऱ्याही जातीचा आणि धर्माचा द्वेष करून चालणार नाही, असं अजित पवार म्हणाले.


निवडणुकांमध्ये फटका बसेल म्हणून निवडणुका घेत नाहीत - अजित पवार


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार सरकारला आहे. आम्हाला असं वाटतं की आत्ताच्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये त्यांना झटका बसला आहे. त्यांनी कितीही आव आणला तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना फटका बसेल, अशी भावना त्यांची झाली असल्यामुळे ते निवडणूक घेण्यात टाळाटाळ करत आहेत, असे अजित पवार म्हणाले.


छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक असू शकते - अजित पवार


राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, ती पक्षाची भूमिका नाही. पक्षाचे प्रवक्ते किंवा नेते यांनी जर भूमिका मांडली असती तर ती ती पक्षाची भूमिका होती. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, असे अजित पवार म्हणाले.